15 दिवसांच्या बाळाला एकटे सोडून विवाहितेची आत्महत्या

बोटोणी येथील विवाहित महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, मारेगाव: अवघ्या 15 दिवसांआधी बाळंत झालेल्या एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथे ही घटना घडली. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शुभांगी विपूल लालसरे (24) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे की विपूल शंकर लालसरे हे बोटोणी येथील रहिवासी आहेत. त्यांचा बेलसरी ता. भद्रावती येथील वामन मिलमिले यांची मुलगी शुभांगी हिच्याशी 16 एप्रिल 2023 रोजी विवाह झाला होता. 15 दिवसांआधीच शुभांगीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सोमवारच्या मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास (मंगळवारी दिनांक 7 मे रोजी) शुभांगी ही बाळाला एकटे सोडून घरून निघून गेली.

काही वेळाने बाळाच्या रडण्याने घरतील व्यक्तींना जाग आली. मात्र त्यावेळी त्यांना बाळाच्या शेजारी आई आढळून आली नाही. त्यामुळे घरच्यांनी गावात तसेच गावालगत असलेले शेत शिवार येथे शोध घेतला. परिसरातील जंगल पालथे घातले. मात्र शुभांगी आढळून आली नाही. दुस-या दिवशी म्हणजे मंगळवारीही दिवसभर लालसरे कुटुंबीय शुभांगीचा शोध घेत होते.

संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास गावात असलेल्या विहिरीकाठी पाणी काढण्याच्या खराडीला चपलेचा एक जोड आढळून आला. त्यामुळे महिलांना संशय आला. त्यांनी ही बाब गावक-यांना व लालसरे कुटुंबीयांना सांगितली. सदर चप्पल ही शुभांगीची असल्याचे स्पष्ट झाल्याने विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता विहिरीत शुभांगीचा मृतदेह आढळून आला. 

15 दिवसातच बाळाचे मातृछत्र हरवले
बाळाला या जगात येऊन अवघे दोन आठवडे झाले होते. मात्र बाळाला समज येण्याच्या आधीच त्याचे मातृछत्र हरवले आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शुभांगीने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे. शुभांगी ही भाजपचे जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे व माजी पंचायत समिती सदस्य सुनिता लालसरे यांची सून आहे.

Comments are closed.