जेव्हा आमदारच टाकतात मटका अड्ड्यावर धाड….

ठाणेदारांच्या आशीर्वादाने परिसरात अवैध धंदे फोफवले, आमदारांचा गंभीर आरोप

विवेक तोटेवार, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भाजी मंडी परिसरात सुरु असलेल्या एका मटका अड्ड्यावर आज संध्याकाळी धाड मारली. यामुळे चांगलीच खळबळ उडाली. आमदार पोलिसांचे पथक घेऊन येत असल्याचे पाहून मटका पट्टी चालवणारे पसार झाले. त्यामुळे ही धाड अयशस्वी ठरली. मात्र यामुळे घरफोडीचे सत्र सुरु असलेल्या वणी परिसरात अवैध धंदे राजरोजपणे सुरु असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान पोलीस हफ्तावसुलीत गुंग असल्याचा खळबळजनक आरोप खुद्द आमदारांनीच केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्याची माहिती द्यावी मी स्वत: धाड मारेल, असे आवाहन संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेला केले आहे. या प्रकरामुळे आगामी काळात आमदार विरुद्ध ठाणेदार असा सामना पाहायला मिळणार आहे.
आज गुरुवारी दिनांक 9 मे रोजी संध्याकाळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना एका अज्ञात इसमाचा फोन आला. या इसमाने त्यांना भाजी मंडी जवळील उर्दू शाळेजवळ राजरोसपणे मटका सुरु असल्याची माहिती दिली. त्यामुळे आमदार हे एपीआय दत्ता पेंडकर व त्यांची टीम घेऊन भाजी मंडी परिसरात पोहोचले. मात्र आमदार व पोलीस येत असल्याचे पाहून मटका पट्टी चालवणा-यांनी पळ काढला. सदर ठिकाणी पाहणी केली असता. या घटनास्थळी वीज चोरी करून त्यावर हॅलोजन लावला होता व त्या प्रकाशात मटका पट्टी सुरु होती.
ठाणेदारांची एसपी व आयजी कडे तक्रार
गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात मटका पट्टी, झंडीमुन्डी व तीन पत्ती सुरु आहे. सर्वसामान्य नागरिक याची वेळोवेळी माहिती आमदारांना देत होते. मात्र सर्व नेते, अधिकारी निवडणुकीत व्यग्र असल्याची संधी साधून ठाणेदारांच्या आशीर्वादाने परिसरात अवैध धंदे होते. अखेर याबाबत एसपी व आयजी कडे देखील आमदारांनी तक्रार केली. मात्र ठाणेदारांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे अखेर स्वत: धाड टाकावी लागली, अशी माहिती आमदारांनी मीडियाला दिली.
हफ्तावसुलीत मग्न असल्याचा आरोप
धाड मारल्यावर आमदारांनी पोलीस प्रशासनावर आरोपांची फैरी झाडत सोबत असलेल्या पोलिसांच्या पथकांची चांगलीच खरडपट्टी काढाली. परिसरात घरफोडी व दुचाकी चोरी नित्याचीच बाब झाली आहे. त्यातच रेती चोरी, तंबाखू तस्करी यासह मटका, झंडी मुन्डी, तीन पत्ती राजरोसपणे सुरु आहे. मात्र पोलीस हफ्तावसुलीत मग्न असल्याने हे सर्व प्रकार सुरु असल्याचा गंभीर व खळबळजनक आरोप आमदारांनी केला.

अवैध धंद्याची माहिती देण्याचे आवाहन
परिसरात कुठे अवैध धंदे सुरु असतात याची पोलिसांना संपूर्ण माहिती असते. मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करतात. मी माझ्या परिसरात कोणतेही अवैध धंदे खपवून घेणार नाही. परिसरात कुठेही मटका, झंडी मुंडी किंवा इतर कोणतेही अवैध धंदे सुरु असल्यास मला फोन करा.
– संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वणी विधानसभा क्षेत्र

परिसरात अवैध धंदे फोफावले आहेत हे सर्वश्रुत आहे. केवळ मटका पट्टीच नाही तर तंबाखू तस्करी, रेती तस्करी इत्यादी अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. संबंधीत विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या आर्शीवादाने हे अवैध धंदे सुरु असल्याचा सातत्याने आरोप होतो. या धाडीनंतर आमदारांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आगामी काळात आमदार विरुद्ध ठाणेदार असा सामना वणीकरांना पाहायला मिळणार आहे.

Comments are closed.