बहुगुणी डेस्क, वणी: माणसाच्या आयुष्याचा काहीच भरवसा नाही. कधी काय होईल तेही सांगता येत नाही. आपल्या नवीन घराचं बांधकामाचं बांधकाम पाहायला जाणाऱ्या व्यक्तीला आयुष्याला मुकावं लागलं. वणी-नांदेपेरा मार्गावरील लायन्स स्कूलजवळ 4 जुलैला रात्री 9-10 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यात साधनकरवाडील ईश्वर किशन गाडगे (51) यांचा मृत्यू झाला.
ईश्वर गाडगे हे मुळचे राजूर कॉलरीचे. ते सध्या वणीतील साधनकरवाडी परिसरात कुटुंबासह राहत होते. ईश्वर गाडगे यांचे नांदेपेरा रोडवरील गुप्ता ले-आऊट येथे नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. ते रोज बांधकामाची पाहणी करण्याकरिता त्याठिकाणी जायचे. 4 जुलैला रात्री नेहमीप्रमाणे ते बांधकामाची पाहणी करण्याकरिता नांदेपेरा रोडने पायी निघाले. तेव्हा लायन्स स्कूलजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मृत ईश्वर गाडगे यांचा मुलगा तुषार गाडगे (24) याने वणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर बीएनएसच्या कलम 281, 106(1) सहकलम 134 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ईश्वर गाडगे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. ईश्वर गाडगे यांना धडक देणाऱ्या वाहनाचा अद्यापही शोध लागला नाही.
Comments are closed.