जितेंद्र कोठारी, वणी : ओव्हरलोड व जड वाहतुकीमुळे शेकडो निष्पाप लोकांच्या दुर्देवी मृत्यूनंतरही पोलीस व परिवहन विभाग ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांविरुद्ध ठोस कारवाई करण्यात हतबल झाल्याचे दिसून येत आहे. ओव्हरलोड कोळसा, सिमेंट, रेती, डोलोमाईट वाहतूक करणारे भरधाव वाहनांसोबत रस्त्यावर उभे असलेले ट्रकही दुचाकी वाहन चालकांसाठी साक्षात यमदुत ठरत आहे.
वणी व झरीजामणी तालुक्यात कोळसा, दगड, डोलोमाईट व चुनखडीच्या शेकडो खाणी आहेत. यात वणी तालुक्यात वेस्टर्न कोलफिल्डच्या तर झरीजामणी तालुक्यात खाजगी कोळसा खाणी आहे. अडेगाव, चिलई, मोहदा, हिवरदरा, नरसाळा येथे डोलोमाईट, चुनखडी व दगडांची अनेक खाणी आहे. या सर्व खाणीतून खाजगी ट्रान्सपोर्ट कंपन्याच्या ट्रकने ओव्हरलोड माल वाहतुक केली जाते. शिवाय चंद्रपूर, गढचांदुर येथील सिमेंट कारखान्यातून ओव्हरलोड सिमेंट भरून दररोज शेकडो ट्रक घुग्घुस, चारगाव, वणी, मारेगाव मार्गे पुढे जातात.
वणी शहरालगत लालपुलीया भागात अनेक खाजगी कोल डेपो आहे. या कोल डेपोमध्ये कोळसा आणणारे व कोळसा भरण्यासाठी आलेल्या वाहनांची वणी यवतमाळ महामार्गाच्या दोन्ही बाजूने रांगा लागलेली असते. अगदी महामार्गावर आणि बेशिस्त उभ्या असलेल्या या वाहनांमुळे अपघात होऊन शेकडो दुचाकीस्वार मृत्युमुखी पडले. नुकतेच शुक्रवार 12 मे रोजी लालपुलीया भागात रत्यावर उभा असलेल्या ट्रकमुळे भीषण अपघात होऊन दुचाकीवर जाणाऱ्या दोन तरुणांचा करुण अंत झाला.
ओव्हरलोड व बेशिस्त मालवाहू वाहनांवर लगाम घालण्यासाठी अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी परिवहन व पोलीस विभागाकडे वारंवार तक्रारी व मागणी केली. परंतु ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची ‘उंची पहुंच’ तसेच बिदागीच्या ओझ्याखाली दबलेल्या परिवहन व पोलिस विभागाने नागरिकांच्या जिवाच्या किमतीवर वाहतूकदारांना खुली सुट दिल्याचा आरोप होत आहे. वणी बहुगुणीला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर, गडचांदुर येथून ओव्हरलोड सिमेंट वाहतूक करणाऱ्या वाहनाकडून 2 हजार, मर्यादित क्षमतेसह वाहतूक करणाऱ्या वाहनाचे 1 हजार रुपये दरमहा एंट्री शुल्क पोलिसांकडून वसूल करण्यात येते.
डब्ल्युसीएल व मुकुटबन कोळसा खाणीतून कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडूनही दोन्ही विभागांना दरमहा प्रसाद वाटप करण्यात येते. या व्यवसायात काही ट्रान्सपोर्टर गब्बर असून त्यांच्याकडून प्रेमापोटी मिळेल तेवढं प्रसाद स्वीकारण्यात येते. कोळसा ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग व वाटा असल्याची बाब उघड आहे. त्यामुळेही पोलिस व परिवहन विभागाचे अधिकारी कारवाई करण्यास हतबल झाल्याचे दिसून येते.
वणी येथे परिवहन विभागाचे कार्यालय नाही. परंतु यवतमाळ प्रादेशिक परिवहन कार्यालयचे सहा. परिवहन अधिकारी दरमहा फेरफटका मारायला येतात. परिवहन अधिकाऱ्यांनी आजपर्यंत वणी विभागता कोळसा, रेती, सिमेंटच्या ओव्हरलोड वाहनांवर कोणतीही मोठी कारवाई केल्याचे आढळून आले नाही. वणी येथे जिल्हा वाहतूक विभागाची उपशाखासुद्धा कार्यरत आहे. मात्र वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यापेक्षा ग्रामीण भागातून येणाऱ्या दुचाकी व मालवाहू चारचाकी वाहनांचे चालान फाडण्यात त्यांचा जास्त इंटरेस्ट दिसून येते.
उद्याच्या अंकात : अवैध प्रवासी वाहतूक – पोलिस विभागाची सोन्याचा अंडा देणारी कोंबडी
Comments are closed.