अपघातात दोन्ही चुलत भावाचा मृत्यू, सालईपोड गावावर शोककळा

उभ्या ट्रकला दुचाकी भीषण धडक, एकाचा जागीच तर दुस-याचा उपचारासाठी नेताना मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: खडकी-बुरांड्याजवळ झालेल्या अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू झाला. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. हरीदास लक्ष्मण टेकाम (28) व किसन लखमा टेकाम (32) असे मृतकाचे नाव आहे. उभ्या ट्रकला दुचाकीने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुस-याला उपचारासाठी चंद्रपूरला नेताना मृत्यू झाला. आज दोन्ही भावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की हरीदास लक्ष्मण टेकाम (28) व किसन लखमा टेकाम (32) हे दोघे बुरांडा-खंडणीजवळील सालईपोड येथील रहिवासी होते. ते सख्ये चुलत भाऊ होते. गुरुवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी त्यांच्या गावात एक कार्यक्रम होता. कार्यक्रम करून ते संध्याकाळी हरिदासची स्लेंडर प्लस (MH34 AY1070) या दुचाकीने मारेगावकडे जात होते. खडकी बुरांडाजवळ एक ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा आहे. 7 वाजताच्या सुमारास टेकाम बंधूच्या दुचाकीची या उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक बसली. 

हा अपघातात दोघांच्याही डोक्याला भीषण मार लागला. अतीरक्तस्रावाने हरिदासचा जागीच मृत्यू झाला तर किसन हा गंभीर जखमी झाला. अपघात होताच परिसरातील लोक गोळा आहे. त्यांनी घटनेची माहिती स्थानिक जनहित कल्याण संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवली. जखमी किसनला आधी मारेगाव येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यांना चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी पाठवले. मात्र वणीजवळ किसनचीही प्राणज्योत मालवली.

हरीदास व किसन या दोन्ही भावावर आज दुपारी 2.30 वाजता गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. हरीदास हा अविवाहित होता. तर किसन याच्या पश्चात पत्नी, 2 मुले व आप्तपरिवार आहे. एकाच दिवशी दोन्ही चुलत भावांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Comments are closed.