अखेर लालपुलिया ते कळमना रस्त्याच्या कामाला सुरुवात

रस्त्यासाठी गावक-यांचा 5 महिन्यांचा दीर्घ लढा

विवेक तोटेवार, वणी: लालपुलिया ते कळमना रस्ता नव्याने बांधावा या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यांपासून आंदोलन सुरु होते. अखेर 5 महिन्याच्या दीर्घ आंदोलनानंतर शुक्रवारी 3 मे रोजी या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. दीड किलोमीटर पैकी अर्धा रस्ता हा कोलवॉशरी बनवून देणार आहे, तर उर्वरित रस्ता हा आमदार खनिज विकास निधीतून तयार केला जाणार आहे.

लालपुलिया ते कळमना हा रस्ता 5 वर्षांआधी तयार करण्यात आला होता. याच मार्गावर कार्तिकेय कोल वॉशरी आहे. कोल वॉशरीमुळे या मार्गावर ओव्हरलोड वाहतूक सुरु होती. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले. रस्त्याची दुरवस्था झाल्याने कळमनावासींना प्रवासासाठी त्रास सहन करावा लागत होता.

28 नोव्हेंबर 2023 रोजी कळमना वासीयांनी या मार्गावर मंडप टाकून रास्ता रोको आंदोलन सुरु केले. या मार्गावरून होणारी ट्रकची वाहतूक आंदोलकांनी बंद पाडली होती. आंदोलन मंडपाला जिल्हाधिकारी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, सुधाकर गोरे जि. प. सदस्य, माजी सभापती संजय पिंपळशेंडे, माजी आमदार विश्वास नांदेकर, बंडू चांदेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, तहसीलदार निखिल धुळधर, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी भेट दिली. त्यांनी समस्येवर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते.

गेल्या आठवड्यात उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्यासोबत आंदोलकांची बैठक झाली. त्यांनी 3 मे पर्यत रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार अशी माहिती देत आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले होते. अखेर शुक्रवारी दिनांक 3 मे रोजी कामाचे भूमिपूजन करून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. रस्त्याचे काम सुरु होताच गावक-यांनी आंदोलन स्थगित केले.

सदर रास्ता हा दिड किलोमीटर असून यातील अर्धा रास्ता हा कार्तिकेय कोल वॉशरी व कोल डेपो तयार करून देणार आहे. तर उर्वरित 1.5 किमीचा रस्ता हा वणीचे आमदार विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी खनिज विकास निधीतून बनवून देणार आहे. असा शब्द आमदारांनी गावकर्यांना दिला आहे.

आंदोलनात जवळपास 5 महिने कळमना गावाच्या सरपंच पुष्पा मधुकर क्षीरसागर, सुवर्णा धनराज चांदेकर, राहुल क्षीरसागर, ऍड रुपेश ठाकरे, मंगेश येटे, मीना धांडे, किरण मडावी, लेजू मडावी, शैलेश कनाके, प्रशांत ढुमणे, शरद सुरपाम यांच्यासह कळमना येथील रहिवासी तसेच परिसरातील गावकरी सहभागी झाले होते.

Comments are closed.