रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रकचा अपघात: 1 ठार, 2 जखमी
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन
विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ दुपारी 12.30 च्या ट्रकने झाडाला धडक दिल्याने अपघात झाला. यात जण ठार झाला असून दोन जण जखमी झाले आहे.
शेंडे ट्रान्सपोर्ट या कंपनीचा ट्रक (MH 31- CB 5686) हा मारेगावच्या दिशेने वणीत येत असताना समोरुन येणा-या ऑटोला वाचवण्यासाठी ड्रायव्हरने प्रयत्न केला असता ट्रकने झाडाला धडक दिली. यात ट्रकमध्ये असलेला रुपलाल तुळशीराम चौधरी (20) हा मजूर राहणार कल्याणपूर मध्यप्रदेश ठार झाला आहे. तर चालक मनिष गरड (26) राहणार बालाघाट, सौतेंद्रकुमार राऊत (22) राहणार कल्याणपूर मध्यप्रदेश जखमी झाले आहेत. हे दोघेही मजूर सध्या छोरीया टाऊनशिप इथे राहत असून कोळसा प्लांटवर हे मजुरीचे काम करतात.
अपघात होताच लोकांनी गर्दी केली. वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांना संपर्क साधला गेला. ते घटनास्थळी आले आणि पंचनामा करून जखमींना रुग्णवाहिका बोलवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
राष्ट्रवादीचे उद्या शनिवारी चक्काजाम आंदोलन
इथे गतीअवरोधक नसल्याने छोटे मोठे अपघात झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चिखलगावचे राजू उपरकर यांनी गतीअवरोधकाची मागणी केली आहे. मात्र या मागणीकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. इथे गतीअवरोधक नसल्याने हा अपघात झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 9 वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.