केवळ पाचशे रुपयाने गमावला जीव, अपघातात मृत्यू
पायी जाताना इसामाचा शिरपूर-खांदला मार्गावर अपघात
विलास ताजने, मेंढोली- शिरपूर ते खांदला मार्गावर मंगळवारी रात्रीच्या दरम्यान ट्रकच्या धडकेत वेळाबाई येथील एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कवडू सदाशिव पुनवटकर वय ४५ असे मृतकाचे नाव आहे.
वणी तालुक्यातील वेळाबाई येथील कवडू पुनवटकर आणि त्यांचा मुलगा सुनिल हा कामानिमित्त (दि.२५) मंगळवारी वणीला आले होते. वणीतील कामे आटोपून परतीच्या प्रवासात सुनिलला त्याचे वडील कवडू पुनवटकर यांनी पाचशे रुपयांची मागणी केली. परंतु सुनिल जवळ पैसे कमी असल्याने तो वडिलांची मागणी पूर्ण करू शकला नाही. परिणामी रागाच्या भरात वडिलांनी दुचाकीवरून गावाला जाण्यास नकार दिला. सुनिलनी वडिलांना समजविण्याचे प्रयत्न केले. मात्र वडील पाचशे रुपयाच्या मागणीवर ठाम होते. अखेरीस नाईलाजाने सुनिल एकटा दुचाकीने गावाला गेला.
सुनिलचे वडील कवडू रागारागाने वणीवरून वेळाबाई येथे जाण्यासाठी पायदळ निघाले. जवळपास सोळा किमीचा प्रवास पायदळ करीत ते शिरपूरच्या पुढे पोहोचले होते. अशातच रात्री दहा वाजताच्या दरम्यान वणीवरून गडचांदूर परिसरातील सिमेंट कंपनीत भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक (क्र. MH 29 BE 972 )चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले आणि ट्रकच्या खाली चिरडून कवडूचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती शिरपूर येथील शिवकृपा कृषी केंद्राचे संचालक अरुण ताजने यांनी शिरपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आरोपी ट्रक चालक नासिरखान मनवरखान रा. (इंदिरानगर) यवतमाळ याला अटक करून दि.२६ बुधवारला न्यायालयात हजर केले. आरोपीची जामिनावर सुटका झाली. मृतकाच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. कवडूच्या क्षुल्लक कारणासाठी रागा येणे आणि अपघाती मृत्यू होण्याच्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.