अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, चालक जागीच ठार

शेळीला चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: शिंदोला पोलीस चौकीजवळ एका अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शुक्रवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुनील निब्रड (52) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मृतकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

सुनील हे मुळचे पुनवट येथील रहिवासी होते. ते शेतीनिमित्त शिंदोला येथे वास्तव्यास होते. शुक्रवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी ते आपल्या स्प्लेंडर (MH34 N5017) या दुचाकीने शेळ्यांसाठी चारा आणायला गेले होते. दरम्यान शिंदोला ते कळमना रोडवरील सिमेंट रोडवर इलेक्ट्रीक पोल जवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. ही धडकेत सुनील यांच्या ड़ोक्याला गंभीर दुखापत झाली. अती रक्तस्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच, शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविला. शुक्रवारी शिंदोला येथे रात्री उशिरा त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अज्ञात आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दुचाकीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध शिरपूर पोलिसांकडून घेतला जात आहे.

Comments are closed.