भरधाव पिकअपची दुचाकीला धडक, एक ठार दुसरा गंभीर

शेतातून घरी परतताना संध्याकाळच्या सुमारास घडली घटना

बहुगुणी डेस्क, वणी: करंजीकडून मारेगावच्या दिशेने येणा-या एका भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर मागे बसलेला गंभीर जखमी झाला. रविंद्र रामकृष्ण अवताडे (35) रा. खडकी असे मृताचे नाव आहे. बुधवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास शिवनाळा फाट्याजवळ ही घटना घडली.

मृत रविंद्र अवताडे हे खडकी ता. मारेगाव येथील रहिवासी आहे. त्यांची मारेगाव करंजी रोडवर शिवनाळा फाट्यालगत शेती आहे. त्यांच्या ट्रॅक्टरवर अतुल वसंतराव किनाके (28) रा. खडकी हा ड्रायव्हर आहे. बुधवारी शेतातील काम आटपून रविंद्र व अतुल हे हिरो होन्डा या दुचाकीने त्यांच्या गावी खडकी येथे परतत होते. दरम्यान शिवनाळा फाट्याजवळ करंजीहून मारेगावच्या दिशेने येणा-या एका भरधाव पिकअपने (MH29 T6651) दुचाकीला जबर धडक दिली.

अपघात होताच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही नागरिकांनी जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रविंद्र यांना मृत घोषीत केले. तर अतुल याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर केले.

रविंद्र यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काही वर्षांआधी रविंद्र यांच्या मोठ्या भावाचा देखील एका अपघातात मृत्यू झाला होता. रवींद्र यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे. या अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.