मारेगावच्या चौघांचा चंद्रपूरजवळ अपघाती मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: राजूरा येथून साक्षगंध सोहळा आटोपून मारेगावला परतताना पडोलीजवळ गाडीचा अपघात होऊन अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. आज दि. 23 जूनला दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एकाच वेळी दोन कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण मारेगाव शहर याने हादरून गेले. विशेष म्हणजे याआधीही अशीच घटना मारेगावातील एका कुटुंबासोबत घडली होती.

युसुफ शेख व रफिक शेख हे मारेगाव येथील रहिवासी होते. त्यांचे मारेगाव येथे शानु ऑटोमोबाईल्स व सानिया कोल्ड्रिंक नामक दुकान आहे. युसुफ शेख व रफिक शेख हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राजुरा येथील साक्षगंध सोहळ्यासाठी बोरेरो गाडीने गेले होते. सोहळा आटोपून ते चंद्रपूर-घुग्गुस मार्गे मारेगाव येथे परत येत होते.

दरम्यान दुपारी 1 वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली-घुगुस मार्गावरील अहमद लॉन (चिंचाळा) नजीक त्यांच्या गाडीच्या स्टेरिंगचा रॉड तुटल्याने गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी डिव्हायडर ओलांडुन दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की त्यांचे बोलेरो गाडीचा समोरील भाग पुरता चकनाचुर झाला.

यात गाडीतील चारही व्यक्ती घटनास्थळीच ठार झाले. शेख युसुफ शेख नबी त्यांच्या पत्नी मुमताज युसुफ शेख, शेख रफिक शेख नबी व त्यांच्या पत्नी संजीदा रफीक शेख असे अपघातात ठार झालेल्या चारही व्यक्तींची नावे आहेत. मृतदेह काढताना सुद्धा पोलीस व वाहतूक प्रशासनाला अनेक समस्येचा सामना करावा लागला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना गॅस कटरचा उपयोग करावा लागला. सदर घटनेने शेख कुटुंबावर पुरता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याआधीही घडली होती अशीच घटना
मारेगाव तालुक्यामध्ये याआधीही अशीच एक घटना घडली होती. यात सिडाणा कुटुंबातील तिघे जण अपघातात मृत्यू पावले होते.

थोरला भाऊ रफीक शेख यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आहे तर लहान भाऊ युसूफ शेख याच्या पश्चात दोन मुली आहे. सदर भीषण अपघाताची माहिती मारेगाव येथे पोहचली असता नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे.

Comments are closed.