निंबाळा फाट्याजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू

अपघात इतका भीषण होता की घटनास्थळावरील लोकांनी दोरखंड बांधून गाडी बाहेर काढली

विवेक तोटेवार, वणी: आज दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान निंबाळा फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 5 लोक जखमी झालेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. तर दोघांवर वणी येथे उपचार सुरू आहे. एक मालवाहक ट्रकने एर्टिडा कारला जबर धडक दिल्याने हा अपघात झाला. नवाज मुजफ्फर शेख (28) असे मृताचे नाव आहे. 

सविस्तर वृत्त असे की मृतक नवाज मुजफ्फर शेख (28) हा मारेगाव येथील रहिवासी होता. तो किराणा दुकान चालवतो. नुकतेच कुटुंबाला हातभार म्हणून त्याने अर्टिगा ही गाडी विकत घेतली होती. ती गाडी तो भाड्याने देत असे. आज बुधवारी दिनांक 24 जानेवारी रोजी नवाज, त्याची आई, दोन पुतणे, भाची, वहिनी व चालक अशा सात जणांसह अर्टिगा या कारने (MH 13 DE7906) आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी चंद्रपूर येथे चालले होते. दरम्यान नवाज हा गाडी चालवत होता. तर चालक कमर हा त्यांच्या बाजूच्या शिटवर बसला होता. दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास निंबाळा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणा-या एक सिमेंटची वाहतूक करणा-या ट्रकने (MH34 BG 1337) त्यांच्या अर्टिगाला जबर धडक दिली.

या धडकेत नवाज हा गंभीर जखमी झाला. तर गाडीतील इतर लोक जखमी झालेत. अपघात इतका भीषण होता की गाडी रस्त्याच्या कडेला असल्यात झुडपात गेली. अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गाडीला दोरखंड बांधून गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. अखेर जेसीबीच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली. तसेच जखमी आणि गाडीतील लोक गाडीबाहेर आले.

काही लोकांनी ऍम्बुलन्स चालक व पोलिसांना याची माहिती दिली. ऍम्बुलन्स तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमीला वणीतील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी नवाजला मृत घोषीत केले. सध्या तिघांना उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे तर दोघांवर वणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. एका 5 वर्षीय पुतण्याला उपचारानंतर सुटी देण्यात आली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

काही महिन्यापूर्वीच निकाह
नवाजची मारेगाव व परिसरात एक सुस्वभावी व्यक्ती म्हणून ओळख होती. 4 महिन्याआधीच त्याचे लग्न झाले होते. कोरोना काळात नवाजच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तो त्याच्या मोठ्या भावासह एकत्र कुटुंबात राहत होता. दोन वर्षाआधीच वडिलांचा आणि त्यानंतर आता नवाजचा मृत्यू झाल्याने शेख कुटुबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच मारेगावात शोककळा पसरली आहे.

हॉटेल चालकावर कु-हाडीने हल्ला, चिखलगाव येथील घटना

 

Comments are closed.