सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील 11 वर्षीय मुलीचा 26 फेब्रुवारी रोज विजेच्या जिवंत ताराचा स्पर्श होऊन मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी तपासा अंती 31 मार्चला सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी वसंता घाटे याला अटक करण्यात आली असून त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की अडेगाव येथील श्रुती किशोर थाटे (11) ही 26 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता दरम्यान आंघोळ करून घरासमोरील तारांवर कपडे सुकवण्यासाठी गेली. कपडे तारावर टाकताच तिला विजेचा शॉक लागला व ती दूरवर फेकल्या गेली. विजेचा शॉक लागल्याची माहिती शेजाऱ्यांना लागताच त्वरित तिला मुकुटबन येथील शासकीय रुग्णालयात व तेथून वणी येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान श्रुतीचा मृत्यू झाला.
मृतक श्रुती हिच्या नातेवाईकांनी वणी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. वणी पोलिसांनी प्रकरण मुकुटबन ठाण्यात वर्ग केले. मुकुटबन पोलिसांनी अडेगाव येथे जाऊन घटनास्थळ पंचनामा केला. मृतकांच्या घरातील सदस्य तसेच शेजारील लोकांचे बयाण नोंदविले. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांना घटनास्थळी पाठवून चौकशी करण्यास पत्र दिले.
घटनास्थळी हजर असलेला गावातील गणेश बुरडकर याने वसंता घाटे यांच्या घरी विद्युत मीटर जोडणी करून कमकुवत केबलचा वापर केला होता. हा केबल मध्ये कटल्याने त्यातून विद्युत प्रवाह सुरू होता. त्याचा करंट टिनाच्या पत्र्यातून कपडे सुकवण्याच्या तारामध्ये गेला व करंट लागूनच श्रुती हिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दोन फुटाचा वायर वसंता घाटे याची पत्नी गिरीजा घाटे हिला काढून दिला व जोड असलेल्या ठिकाणी टेपपट्टी मारल्याचे सांगितले.
आरोग्य विभागातील तपासणी पत्र वीज वितरण कंपनीचा निरीक्षण व बुरडकर याचा बयाण झाले. जोड केबल ची माहिती पडू नये म्हणून केबल नष्ट केला. वसंता घाटे यांच्या निष्काळजी पनामुळे श्रुती हिचा जीव गेल्याचे तपासात आढळल्याने 31 मार्च रोजी पोलिसांनी वसंता घाटे यांच्याविरुद्ध कलम 304, 201 नुसार गुन्हा दाखल केला.
आरोपी वसंता याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड व जितेश पानघाटे करीत आहे.
हे देखील वाचा:
ग्रामीण भागात कोरोनाचे तांडव, भांदेवाड्यात आढळले 10 पॉजिटिव्ह