विवेक तोटेवार, वणी: एक वर्षांपासून महिला अत्याचार व आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला वणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. नागपूर येथील एका सराफा व्यापाऱ्याची फसवणूक केल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी या मिस्टर नटवरलालला अटक केली होती.
आरोपी आशुतोष अशोक महाजन (30) याने वणी एका तीस वर्षीय युवतीचे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केले होते. त्यातच त्या महिलेकडून 1 लाख 40 हजार रुपये घेऊन तो फरार झाला होता. याबाबत पीडितेने 2 मे 2019 रोजी वणी पोलिसात तक्रार दिली होती. पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपीविरुद्ध कलम 376 (N), 323, 420 नुसार गुन्हा दाखल केला होता. परंतु वणी पोलिसांना तो काही गवसला नाही.
दरम्यान आरोपी आशुतोष हा नागपूर येथे नाव बदलवून राहत होता. तसेच तिथे तो डॉक्टर म्हणून वावरत होता. काही दिवसांआधी त्याने नागपूर येथे एका सराफा व्यापाऱ्यांकडून दोन सोन्याचे सिक्के घेतले व नगदी पैसे नसल्याचा बहाणा करून चेक दिला होता. परंतु चेक वटला नाही. या घटनेची सराफा व्यापाऱ्याने नागपूर पोलिसात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून नागपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीस 23 जुलै रोजी अटक केली.
अखेर जुन्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी 29 जुलै रोजी आरोपीला वणी पोलिसांच्या स्वाधीन केले. 30 जुलै रोजी या आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेचा तपास एपीआय माया चाटसे व नापोका अविनाश बनकर करीत आहे.