मनसे पदाधिकाऱ्यांच्या 8 वर्षांच्या संघर्षाला मिळाला अखेर न्याय

जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावरील आंदोलनातील मनसैनिक निर्दोष मुक्त

बहुगुणी डेस्क, वणी: मागे झालेल्या काही भयंकर घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता. बोगस कीटकनाशकामुळे फवारणी केल्यावर तब्बल 25 शेतकऱ्यांचा करूण अंत झाला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली.

मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी मनसे नेते राजू उंबरकर, जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी कार्यालयावर आंदोलन झाले होते. मात्र या आंदोलनात प्रशासनानेच मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. परंतु तब्बल 8 वर्षांनंतर जिल्हा न्यायालयाने या प्रकरणाची अंतिम सुनावणी घेतली. या सर्व आंदोलक मनसे पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यवतमाळ जिल्ह्यात बोगस कीटकनाशक फवारणीमुळे सन 2017 साली जिल्ह्यात 22 ते 25 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर अनेक शेतकऱ्यांना अपंगत्व, त्वचेचे रोग व अन्य आजारांना सामोरे जावे लागले. याच मुद्द्याला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर व जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार यांच्या नेतृत्त्वात कृषी कार्यालयावर आंदोलन झाले.

मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रूपयांची आर्थिक मदत, फवारणीमुळे अपंगत्व आलेल्या शेतकरी ,शेतमजुरांना आर्थिक मदत, देण्यात यावी, कीटकनाशके बनविणारी कंपनी तथा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागण्यांसाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते.

परंतु कृषी विभागाने हे आंदोलन दाबण्याच्या प्रयत्न केला. या आंदोलनात सहभागी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर जिवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेत. त्यांना अटक करण्यात आली होती.

तब्बल आठ वर्षांनंतर या प्रकरणांचा निकाल लागला. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अ. अ. लऊळकर यांच्या दालनात अंतिम सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायधिशांनी सरकारी वकील व प्रतिवादी वकील यांची बाज ऐकुन घेतली. यामधील मनसे नेते राजू उंबरकर, मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांच्यासह 8 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

मनसेच्या या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात दौरा केला होता. मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रूपयांची आर्थिक मदत करून कीटकनाशके उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या चौकशीचे आदेश देत त्या कंपनीला टाळे लावले होते. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने ॲड.राजेंद्र साबळे व ॲड. अमित बदनोरे यांनी प्रखर बाजु मांडली.

दडपशाहीला भीक घालणार नाही
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यात बोगस बियाणे, कीटकनाशके नेहमीच त्यांच्या माथी मारली जात आहेत. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांविरोधात बोलायला कोणीच तयार नसताना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे नेहमीच अग्रेसर राहिली आहे. परंतु भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कृषी प्रशासनाने आपले पाप लपविण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत. आम्हाला तुरुंगात टाकून दडपशाही चालविली. अशा दडपशाहीला भीक न घालता माझ्या सर्व सहकाऱ्यांनी याविरोधात न्यायालयात दाद मागितली. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असल्याने आज न्यायालयाने आमची निर्दोष मुक्तता केली. 8 वर्षांच्या लढ्याला आज यश मिळाले. शेवटी विजय हा सत्याचाच झाला आहे. या निर्णयामुळे भविष्यात शेतकरी हिताचा लढा अधिक तीव्र करून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देऊ.
राजू उंबरकर
(नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, गजानन भालेकर, अनिल हमदापुरे, अभिजित नानवटकर, शेख सादिक, सचिन येलगंधेवार, शेख साजीद, कुणाल जतकर यांचा सहभाग होता.

Comments are closed.