सावधान… नोकरीचे आमिष दाखवून गंडवणारी टोळी सक्रीय
पैसे मागणा-यांची पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन
सुशील ओझा, झरी: सध्या बेरोजगारीचा भस्मासूर वाढला आहे. सरकारी नोकरी तर नाहीच त्यातही खासगी नोकरीही आता कमी झाल्या आहेत. त्यात जर चांगल्या पगाराची खासगी नोकरी असली तरी त्यासाठी पुणे, मुंबई, नागपूर इत्यादी मेट्रो सिटीत जावे लागते. अनेकांना कुटुंब, पालकांची जबाबदारी, शेती इत्यादी कारणास्तव परिसरातच नोकरीची गरज असते. अनेक बेरोजगार तरुण तरुणींचाही परिसरात नोकरी करण्याकडे अधिक कल असतो. नेमका हाच फायदा घेऊन परिसरात असणा-या कंपनीमध्ये नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडवणारी टोळी परिसरात सक्रीय झाली आहे.
तालुक्यातील मुकुटबन येथे एक कोळसा खाण, दोन डोलोमाईट खाण तर एक चुन्याची खाण आहे. लवकरच परिसरात सर्वात मोठी खासगी सिमेंट कंपनी सुरू होणार आहे. या सिमेंट प्लांटचे अंतर्गत कामं सुरू झाले असून येत्या दीड ते दोन वर्षात फॅक्ट्रीचे काम पूर्ण होऊन उत्पादनाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे हजारों तरुण इथे नोकरी मिळण्याच्या आशेवर आहेत. सिमेंट फॅक्ट्री सुरू होणार असल्याने संपूर्ण जिल्यासह तेलंगणा व विदर्भातील तरुण इथे नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी तरुण युवक राजकारणी लोकांपासून तर गावपुढाऱ्याऱ्यांच्या चकरा मारताना नोकरीसाठी सेटिंग लावताना दिसत आहे. बेरोजगारांची ही गरज ओळखून आता नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करणारी टोळी सक्रिय झाली आहे.
यात काही लोक हे मंत्री किंवा लोकप्रतिनिधी असल्याचा आव आणतात. तर काही लोक कंपनीतील साहेबांचा नातेवाईक असल्याची बतावणी करीत आहे. काही लोक कंपनीतल्या अधिकाऱ्यांसोबत चांगले व जवळचे समंध असल्याचे त्यांनी मलाच गरजू लोक शोधण्यासाठी सांगितल्याची माहिती देतात. अशा लोकांच्या बोलण्यावर बेरोजगार फसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्राप्त माहितीनुसार ही टोळी गरजू बेरोजगार तरुण तरुणींकडून या शिक्षणाचे कागदपत्र व बायोडाटा घेत आहे.
दोन वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील एक बँक मुकुटबनला चालू होणार होती. त्याकरिता मुकुटबन व परिसरातील तरुण तरुणींकडून या बँकेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाखाली ४० हजारांपासून तर अडीच लाखापर्यंत पैसे उकळून फसविण्यात आले. पुढे ही बँक बुडीत असल्याचे लक्षात आल्याने लोकांनी पैसे परत मागितले मात्र आजपर्यंत त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. पण यात मध्यस्थी करणा-या दलालांनी त्यांची दलाली आधीच काढून घेतल्याची माहिती आहे.
नोकरीसाठी पैसे मागत असल्यास तक्रार करा – ठाणेदार धर्मा सोनुने
बेरोजगार तरुण तरुणींनी कोणालाही नोकरीच्या नावाने पैसे देऊ नये. नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचे पैसे कंपनीकडून घेतल्या जात नाही. याआधीही अनेक ठिकाणी नोकरीसाठी पैसे घेऊन बेरोजगारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुणीही नोकरीसाठी पैसे मागत असल्यास देऊ नये. जरी पैसे मागणारा व्यक्ती गावातील का असेना. कुणीही पैशाची मागणी केल्यास पोलीस स्टेशनला येऊन कळवावे. अशा लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल- ठाणेदार धर्मा सोनुने