वणी: झरीजामणी तालुक्यातील अडेगाव ग्रामपंचायतीनं सध्या दलित वस्तीसाठी रस्ता बांधकामाचं काम हाती घेतलं आहे. रस्त्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. मात्र हे अतिक्रमण काढण्यासाठी गावपुढारी दुजाभाव करताना दिसत आहे. अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीनं केवळ दोन लोकांना तगादा लावला आहे. ग्रामपंचायत अतिक्रमणाच्या कामात दुजाभाव करत आहे अशी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण असताना केवळ दोघांनाच नोटीस का असा तक्रारकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, अडेगांव ग्राम पंचायत मध्ये दलित वस्ती निधीतून रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. आता नवीन रस्त्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यासाठी रस्त्यालगतच्या ग्रामस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र गावातील अशोक महादेव येवले आणि देवानंद रामकृष्ण येवले या दोघांनाच अतिक्रमण काढण्यासाठी तगादा लावण्यात आला आहे. असा आरोप या दोघांनी केला आहे.
गावाच्या विकासासाठी रस्त्या बनतोय याचं तक्रारकर्त्यांनी स्वागत केलं आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र गावातील याच रस्त्यावर इतरांचंही अतिक्रमण आहे. ग्रामपंचायत हे अतिक्रमण काढताना दुजाभाव करत असून पोलिसांच्या माध्यमातूनही ग्रामपंचायतीनं दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या वैमनस्यातून येथील पदाधिकारी कुरघोडी करून आमच्या कुटुंबास वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप येवले यांनी केला आहे. या प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष द्यावी अशी मागणी तक्रारकर्त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.