पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सहाय्यक कृषी अधिकारी सरसावले !
एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री मदत निधीत स्वेच्छेने जमा
विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या कठीण काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यातील सहाय्यक कृषी अधिकारी संघटना पुढे सरसावली आहे. त्यांनी आपल्या एका दिवसाच्या वेतनाची रक्कम मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन सादर केले आहे.
सध्या महाराष्ट्रात सुमारे 10 हजार सहाय्यक कृषी अधिकारी कार्यरत आहेत. हे अधिकारी शेतकऱ्यांशी थेट संपर्कात असतात आणि त्यांचे मुख्य कार्य म्हणजे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, पंचनामे तयार करणे, शासनाला माहिती पुरवणे आणि मदत वितरणात सहभाग घेणे. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन काम करत असल्यामुळे त्यांच्यात भावनिक नाते निर्माण झाले आहे. त्यामुळेच या संकटात शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना अधिक तीव्र झाली आहे.
सप्टेंबर 2025 महिन्याचे ऑक्टोबरमध्ये देय असलेले वेतनातून एका दिवसाचे वेतन स्वेच्छेने मुख्यमंत्री मदत निधीत वर्ग करण्याचा निर्णय सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेने घेतला आहे. या उपक्रमातून जवळपास दीड कोटी रुपयांचा निधी जमा होण्याची शक्यता आहे, जो पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल.
सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा डेटा संकलन सुरू असून लवकरच ही माहिती शासनाला सादर केली जाणार आहे. शासनही मदतीसाठी प्रयत्नशील आहे, मात्र सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची ही स्वयंस्फूर्त मदत शेतकऱ्यांच्या मनात आश्वासक विश्वास निर्माण करणारी ठरते.



Comments are closed.