जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत संताजी स्कूलच्या विद्यार्थिनींचा दणदणीत विजय !

विभागीय स्पर्धेत सर्वदा व प्रांजली करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

विवेक तोटेवार, वणी:  20 सप्टेंबर रोजी यवतमाळ येथे आयोजित जिल्हास्तरीय शालांत कराटे स्पर्धेत संताजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी आपल्या दमदार कामगिरीने प्रथम क्रमांक पटकावला. 14 वयोगटात सर्वदा नरेश मुरस्कर आणि 16 वयोगटात प्रांजली विजय ठक यांनी आपल्या कौशल्याने स्पर्धेत बाजी मारली. त्यांच्या या यशामुळे त्या आता अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या यशाबाबत शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेत वणी तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. संताजी स्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळ कौशल्य, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी 26 सप्टेंबर रोजी शाळेत विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. 

सत्कार सोहळ्यात शाळेचे अध्यक्ष रमेश येरणे, उपाध्यक्ष ओमप्रकाश निमकर, सचिन आंबटकर, तानाजी पाऊणकर, तिखट सर, बुटले सर, शोभना गंधारे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शाळेच्या वतीने दोन्ही विद्यार्थिनींना पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाला नवा आयाम मिळाला आहे.

Comments are closed.