अहेरल्ली शाळेतील विद्यार्थ्यांना कंबरेवर पाण्यातून काढावी लागते वाट

रेल्वे अंडरपास बोगद्यामध्ये साचले पावसाचे पाणी

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील अहेरल्ली येथील जि.प.प्राथ. शाळा व राजाराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेतून ये-जा करताना कंबरेवर पाण्यातून कसरत करवी लागत आहे. बोरी पाटण ते मुकुटबन राज्यमार्गावर अहेरल्ली गावाजवळ रेल्वे विभागाने तयार केलेल्या बोगद्यात पावसाचे पाणी साचल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. जर येत्या 7 दिवसात जर रेल्वे विभागाने अहेरल्ली येथील बोगद्यातून पाणी उपसा केला नाही तर वणी रेल्वे स्थानकावर शाळा भरविण्यात येईल असा इशारा अहेरल्लीचे सरपंच हितेश राऊत यांनी दिला आहे. 

वणी-आदिलाबाद रेल्वे मार्गावर मानवरहीत क्रॉसिंगच्या ठिकाणी रेल्वे विभागाने ओव्हरब्रिज बांधले आहे. त्यामुळे बोरी पाटण मुकुटबन राज्यमार्गावर कमळवेल्ली, सतपल्ली व अहेरल्ली गावाबाहेर रस्ता खोदून अंडरपास तयार करण्यात आला आहे. मागील 2 दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पावसामुळे या बोगद्यामध्ये पाणी साचले आहे.

अहेरल्ली येथील राजाराम विद्यालय व जि.प.प्राथ. शाळामध्ये अहेरल्ली, सतपल्ली, उमरीपोड, दाभा, वठोली व देमाडदेवी गावातील विद्यार्थी शिक्षणाकरिता दररोज ये जा करतात. मात्र रस्त्यावरील बोगद्यात कंबरेवर पाणी साचून असल्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश काढून पाण्यातून वाट काढावा लागत आहे.

… तर वणी रेल्वे स्थानकावर शाळा भरवू – हितेश राऊत, सरपंच
अंडरपासच्या ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पाण्याची मोटार बसविण्याचे नियम आहे. मात्र असे असतानाही रेल्वे विभागाने सदर ठिकाणी पावसाचे पाणी उपसा करण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे येत्या 7 दिवसात जर रेल्वे विभागाने अहेरल्ली येथील बोगद्यातून पाणी उपसा केला नाही तर वणी रेल्वे स्थानकावर शाळा भरविण्यात येईल.
– हितेश राऊत, सरपंच अहेरल्ली

हे देखील वाचा:

दुस-या फळीतील नेत्यांना वेध थेट नगराध्यक्ष निवडणुकीचे

Comments are closed.