वणीकरांना अजितदादांचा परिचय आ. संजय देरकरांमूळे…!
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महिन्याभरातच अजितदादा वणीत
श्रीवल्लभ के.सरमोकदम: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला.वणीतही ही शोककळा प्रकर्षाने दिसून आली. पण वणीकरांना अजितदादांचा खर्या अर्थाने परिचय झाला तो तब्बल २७ वर्षांपूर्वी आमदार संजय देरकरांमूळे. तेव्हापासून वणीकरांसाठी अजितदादा अन् देरकर हे जणू समिकरणच झाले होते. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या स्थापनेनंतर अवघ्या महिनाभरात अजितदादांचा वणीतील पहिला दौरा पार पडला होता.
१९९९ मधे अवघ्या चाळीस वर्षांचे अजितदादा आमदार होते. त्याच वर्षी दि.१० जून रोजी राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापना झाली. इकडे वणी शहरातील उदयोन्मुख नेतृत्व संजय देरकर यांनी वणी नागरी बॅकेच्या मुहूर्तमेढीचा चंग बांधला होता. एखाद्या बड्या नेत्याच्या हातून हे कार्य सिद्धीस जावे ही त्यांची मनोमन इच्छा होती. पण राजकारणातील नवखेपणामूळे संपर्काची समस्या उद्भवली होती.मुंबईतील राजकीय विश्वात रुळलेल्या व्यक्तीशिवाय ते शक्य नव्हते.ही खंत त्यांनी एम.एस. बॅकेचे तत्कालिन उपाध्यक्ष भय्याजी चवने यांच्याजवळ बोलून दाखविली. भय्याजींनी तत्काळ त्यांची भेट मुंबईत अजितदादांसोबत घडवून आणली.
अवघ्या चाळीसीत असलेल्या अजितदादांनी देरकरांना सहकार क्षेत्राचा कानमंत्र देत बॅकेच्या उद्घाटनास येण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी ते दि.५ जुलै १९९९ रोजी वणीत पहिल्यांदा आले. त्यापूर्वी वणीकरांना अजितदादांचा कोणताही परिचय नव्हता. त्यांचे नावही केवळ वर्तमानपत्रातूनच परिचित होते. पण वणी नागरी बॅकेच्या निमित्ताने वणीकरांना अजितदादांचा खर्या अर्थाने परिचय झाला.
त्यानंतर आ.देरकरांनी अजितदादांची कास धरली ती तब्बल दोन दशकापर्यंत. या काळात वणीकरांसाठी अजितदादा अन् देरकर हे जणू समिकरणच बनले. त्यानंतर अजितदादा वणीत तिन ते चार वेळा येवून गेले. संजय देरकरांचाही त्यांच्याशी असलेला सौहार्द कमालिचा वाढला. राजकीय अपरिहार्यतेपोटी देरकरांनी राष्ट्रवादीची साथ सोडून उबाठाशी घरोबा केल्यानंतरही त्यांचा अजितदादां विषयीचा आदर अन् संबंध तसूभरही कमी झाला नाही.

उत्स्फुर्त श्रद्धांजली अन् आठवणींना उजाळा
उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलिन झाल्यानंतर सायंकाळी स्थानिक टिळक चौकात वणीकरांकडून उत्स्फुर्तपणे श्रद्धांजली देण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या श्रद्धांजली सभेत, स्थानिक पातळीवरील सर्वच पक्षांचे पहिल्या फळीतील बव्हंशी नेते उपस्थित होते. शेकडो वणीकरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या श्रद्धांजली सभेत आ.संजय देरकर, माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, मनसेचे नेते राजू उंबरकर, शिवसेनेचे विजय चोरडीया,अॅड.देविदास काळे, राकेश खुराणा,आशिष मोहीतकर यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
आ.संजय देरकरांचा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्याशी संपर्क आलेली प्रथम व्यक्ती म्हणजे अजितदादा म्हणता येईल.परंतू देरकरांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर अजितदादा पुन्हा वणीत आलेच नाही.किंबहुना राष्ट्रवादीला त्या ताकदीचा नेता स्थानिक पातळीवर गवसलाच नाही.





Comments are closed.