सावधान… ! बँकेतून पैसे काढत आहात? भामट्यांचा 1 लाखांवर डल्ला

पैसे पडल्याची बतावणी करून दुचाकीतून पैसे लंपास, आठवड्याभरात दुसरी घटना

बहुगुणी डेस्क, वणी: बँकेतून तुम्ही मोठी रक्कम काढत असाल तर आता सावध राहा. कारण आता बँकेत व बँकेसमोर भामटे तुमच्या पाळतीवर असून ते तुम्हाला गंडवण्याची शक्यता आहे. सोमवारी बँकेतून शेतीसाठी काढलेली एक लाखांची कर्जाची रक्कम दोन भामट्याने दिवसाढवळ्या लुटली. वणीतील माळीपु-याजवळ दुपारी ही घटना घडली. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच अशीच एक घटना साई मंदिर समोरील एका बँकेसमोर घडली होती. यात सेम हीच ट्रिक वापरून भामट्याने दुचाकीच्या डिक्कीतून 2 लाख लंपास केले होते. त्यानंतर आता लगेच ही घटना घडली आहे. त्यामुळे बँकेतून पैसे काढल्यावर आता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

तक्रारीनुसार, श्रीराम आनंदराव लेडांगे (56) हे बल्लारशाह पेपर मिल येथील येथील जुन्या वसाहतीत राहतात. त्यांची वणी तालुक्यातील मजरा येथे शेती आहे. त्यांना शेतीसाठी एका बँकेचे एक लाख 3 हजारांचे पीक कर्ज मंजूर झाले होते. त्यामुळे ते सोमवारी दिनांक 26 मे रोजी सकाळी त्यांच्या दुचाकीने वणीत पैसे विड्रॉल करण्यासाठी आले होते. त्यांनी बँकेतून 1 लाख रुपये काढले. काढलेले पैसे त्यांनी दुचाकीच्या पेट्रोल टँकवर असलेल्या पॉकेटमध्ये ठेवले. त्यानंतर ते टिळक चौक ते खाती चौक, ब्राह्मणी रोड मार्गे बल्लारशाह येथे परत जाण्यासाठी निघाले.

12 वाजताच्या सुमारास ते टिळक चौकातून खाती चौकाकडे जात होते. दरम्यान माळीपुरा जवळ त्यांच्या दुचाकीच्या मागून एक दुचाकी आली. दुचाकीवरच्या एकाने श्रीराम यांना तुमचे पैसे खाली पडले, असे सांगितले व ती दुचाकी पुढे निघून गेली. श्रीराम यांना रस्त्यावर पैसे पडलेले दिसले. त्यांनी दुचाकी रस्त्यावर लावली व ते पैसे उचलण्यासाठी खाली उतरले. पैसे उचलण्यासाठी गेले असता, त्याच वेळी मोटारसायकलवरून आलेले 2 भामटे दुचाकीच्या पॉकेटमध्ये ठेवलेले पैसे घेऊन पसार झाले.

बँकेसमोर वाढलेत भामटे
गेल्या आठवड्यात अशीच एक घटना साई मंदिर समोरील एका बँकेसमोर घडली होती. यामुळे चोरटे हे पैसे काढणा-यांच्या पाळतीवर असल्याचे समोर येत आहे. मोठी रक्कम काढून ग्राहक बँकेबाहेर आल्यावर एक चोरटा पैसे फेकतो व पैसे पडल्याचे सांगतो. तर त्याचा दुसरा साथीदार दुचाकीच्या डिक्कीतील किंवा पॉकेटमधले पैसे लंपास करतो. भामट्यांना कुणाकडे मोठी रक्कम आहे याची संपूर्ण माहिती असते. त्यामुळे यातील एक भामटा बँकेत देखील हजर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सावज बाहेर आला की दुस-या साथीदाराला याची माहिती दिली जाते. सावज पैसे उचलण्यासाठी उतरला की हे भामटे दुचाकीच्या डिक्कीतील पैसे घेऊन पसार होतात. तर मार्च अशीच एक घटना घडली होती. यात पिशवीला ब्लेडने चिरा मारून मोठी रक्कम लंपास केली होती.  

सदर भामटे हे हेल्मेट घालून होते. पैसे काढून नेल्यावर ते क्षणात दुचाकीने पसार झाले. त्यामुळे हे सराईत असल्याचे समोर येत आहे. श्रीराम यांना गंडवल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी याबाबत ततकार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून दोन अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 304 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.  

या आठवड्यातील ही दुसरी घटना
गेल्या आठवड्यात साई मंदिर चौक जवळील एका बँकेच्या समोरून पैसे पडल्याची सांगत एका भामट्याने एका शिक्षकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून 2 लाख रुपये लंपास केले होते. त्यानंतर लगेच ही दुसरी घटना घडली आहे. सध्या दिवसा ढवळ्या बसस्थानकावर पर्स चोर, लग्नात चेन स्नॅचर, बँकेसमोर भामटे चो-या करीत आहे. तर रात्री बंद घरी चोरटे घरफोड्या करीत आहे. सातत्याने होत असणा-या या घटनेतील आरोपी मात्र काही केल्या पोलिसांना गवसत नाही. त्यामुळे या घटना सातत्याने होत आहे. सातत्याने घडणा-या घटनांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.