बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील पाथरी येथे शेतात साठवून ठेवलेले बोगस (प्रतिबंधित) बियाणांचा साठा धाड टाकून जप्त करण्यात आला. या कारवाईत साडे तेरा हजारांचे बी-बियाणे, दोन मोटार सायकल (किंमत अंदाजे सव्वा दोन लाख) जप्त केली आहे. कृषी विभाग व मारेगाव पोलिसांनी ही करवाई केली आहे. या प्रकरणी शेतमालक व दोन सहकारी धाड पडताच पसार झाले आहे. त्यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पेरणीचा काळ जवळ येताच मोठ्या प्रमाणात बोगस बि-बियाणे विक्रीला उधाण येते. अशा बोगस बियाणे विक्री करणा-यांविरोधात कठोर शासन करावे अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून शेतकरी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी करत आहेत. याच संधीचा गैरफायदा घेत काही कृषी केंद्र चालक परराज्यातील व विना परवाना असलेल्या बोगस बियाण्यांची विक्री करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असून त्यांच्या शेती उत्पादनावरही याच प्रतिकूल परिणाम होत आहे. अनेकदा बोगस बियाण्यांमुळे पेरणी वाया जाते आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
बोगस बी-बियाणे विक्री करणा-या कृषी केंद्रचालकांवर ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे अशा संघटित गुन्हेगारांवर अंकुश ठेवता येईल. अशी मागणी मनसेने केली आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. कृषी विभागामार्फत तालुक्यातील कृषी केंद्रा मधून बोगस बियाणे तपासणी करण्यासाठी नमुने गोळा केले जाऊन ते तपासणीसाठी पाठविले जातात परंतु त्याचा कोणताच अहवाल प्राप्त होत नाही किंवा तो जाहीर केला जात नाही. असाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
बोगस बियाणे म्हणजे काय?
बोगस बियाणे म्हणजे कमी दर्जाचे, बनावट किंवा अनधिकृत बियाणे. अनेकदा डुप्लीकेट किंवा कमी प्रतिच्या बियाण्यांची नामांकित कंपनीच्या पाकिटांवर किंवा नावावर विक्री केली. यात कंपनीच्या लोगोचा गैरवापर, बेकायदेशीर ट्रेडमार्क, किंवा चुकीचे लेबलिंग केले जाते, ज्यामुळे ते खऱ्या बियाण्यासारखे वाटतात. अनेकदा रिचर्स पूर्ण झालेली नसल्याने बी बियाणांना शासनाची विक्रीसाठी परवानगी नसते. मात्र असे बियाणे कमी दरात शेतक-यांना विकून शेतक-यांची फसवणूक केली जाते. कापसाचे असे बियाणे तेलंगणातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सप्लाय केले जाते. याला चोरबीटी असेही म्हटले जाते. बोगस बियाणांमुळे शेतक-यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो.
निवेदन देताना मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शंकर पिंपळकर, गोविंदराव थेरे, विलन बोदाडकर, रमेश पेचे, परशुराम खंडाळकर, दिलीप मस्के,विठ्ठल हेपट, प्रविण कळसकर, अतुल काकडे, मंगेश येटे, सूरज काकडे, धीरज बगवा, योगेश माथनकर, गणेश धांडे, कृष्णा कुकडेजा, गौरव धांडे आदी उपस्थित होते.





Comments are closed.