बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील आदर्श हायस्कूलच्या शिक्षिका अलका रविंद्र साळवे यांची यवतमाळ जिल्हा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीचे शैक्षणिक, सहकार तसेच सामाजिक क्षेत्रातून स्वागत होत असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अलका साळवे यांना शिक्षण क्षेत्रासोबतच सहकार क्षेत्रातील कामकाजाचा अनुभव आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी असलेला त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क, सभासदांच्या अडचणी समजून घेण्याची कार्यपद्धती आणि जबाबदारीने काम करण्याची भूमिका यामुळे त्यांच्या निवडीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.
यवतमाळ जिल्हा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था ही जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची महत्त्वाची सहकारी वित्तीय संस्था आहे. शालेय कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत, कर्जविषयक सुविधा आणि विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून संस्थेचे कामकाज अधिक सक्षम करण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर असते.
अलका साळवे या मारेगाव मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रविंद्र साळवे यांच्या पत्नी आहेत. अलका यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कामकाजाला शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवाची जोड मिळणार असून, सभासदांच्या प्रश्नांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षम नेतृत्वाचा संस्थेला निश्चितच लाभ होऊन पतसंस्थेच्या कार्यक्षमतेला नवी दिशा, तर प्रगतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, अलका साळवे यांच्या उपाध्यक्षपदी निवडीबद्दल मुख्याध्यापक संघ, मारेगाव यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या सभासदांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे काम होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

सभासदांच्या हिताला प्राधान्य देणार – अलका साळवे
यवतमाळ जिल्हा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविल्याबद्दल मी सर्व सभासद, सहकारी आणि शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानते. संस्थेच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा आणि अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. संस्थेची विश्वासार्हता अधिक दृढ करण्यासोबतच सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने काम करण्याचा माझा प्रयत्न राहील,” – अलका रविंद्र साळवे, उपाध्यक य.जि. शा.स पतसंस्था
त्यांच्या निवडीमुळे वणी परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातही आनंदाचे वातावरण असून, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सहकारी आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments are closed.