नवजात बाळ प्रकरणी सर्व आरोप बिनबुडाचे, डॉ. महेंद्र लोढा यांचा खुलासा

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियात एका नवजात बाळाच्या फोटोसह डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या विरोधात एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये डॉक्टर लोढा यांच्या निष्काळजीपणा एका नवजात मुलाच्या जीवावर बेतलाय अशा आषयाचा मजकूर होता. त्यावर डॉक्टर लोढा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शुक्रवारी दिनांक 4 जुलै रोजी विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संपूर्ण प्रकरणाबाबत खुलासा करत त्यांच्यावरचे आरोप खोडून काढले. तसेच सदर घटनेमुळे व्यथित होऊन त्यांनी वणी ग्रामीण रुग्णालयाच्या मानवसेवी स्त्रीरोग चिकित्सक (आयपीएचएस) या पदावरून राजीनामा दिल्याची माहिती देखील दिली.

सविस्तर वृत्त असे की भाग्यश्री नरेंद्र बुजाडे या वणीतील भगतसिंग चौक परिसरातील रहिवासी आहे. 28 जुलै रोजी त्यांची वणीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झाली. प्रसूतीनंतर नवजात बाळाचे शौच व लघवीचे अवयव अविकसित असलेले, शिवाय पोटावर नाभीच्या ठिकाणी अतिरिक्त मांस असलेले निदर्शनास आले. लोढा हॉस्पिटल येथील सोनोग्राफी सेंटरला सरकार मान्यता असून त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयातील गर्भवती महिलांची मोफत सोनोग्राफी केली जाते. सदर सोनोग्राफीचे 400 रुपये शुल्क ग्रामीण रुग्णालयाद्वारा लोढा हॉस्पिटलला दिले जाते.

ग्रामीण रुग्णालयात प्रसूती होणा-या सर्व गरोदर महिलांची प्रसूतीपूर्व सोनोग्राफी लोढा हॉस्पिटल येथे केली जाते. भाग्यश्री बुजाडे यांनी प्रसूतीच्या सव्वा दोन महिने आधी म्हणजे दिनांक 22 मे 2023 रोजी लोढा हॉस्पिटल येथील सोनोग्राफी सेंटरवर जाऊन सोनोग्राफी केली होती. मात्र सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी बाळाच्या वाढीबाबत पुरेशी माहिती दिली नाही. त्यामुळे अवयव अविकसीत झालेले बाळ जन्माला आले, असा आरोप नवजात बाळाच्या पालकांनी केला.

डॉ. लोढा यांचा खुलासा…
लोढा हॉस्पिटलमध्ये साधी म्हणजे leval-1 ची सोनोग्राफी मशीन आहे. महिलेने ज्या दिवशी सोनोग्राफी केली तेव्हा गर्भाशयातील बाळ 22 आठवडयांचे होते. लेव्हल 1 च्या सोनोग्राफीला अनेक बंधने असतात. त्यामुळे विसंगती चाचणी (anomaly scan) साठी 3डी सोनोग्राफी केंद्रावर जाऊन सोनोग्राफी करण्याचा सल्ला सदर महिलेला दिला. याबाबत रेफर लेटर देखील महिलेला देण्यात आले. मात्र महिलेनी anomaly scan ही ऍडव्हान्स तंत्रज्ञान असलेली सोनोग्राफी केली नाही. प्रसूती होत पर्यंत तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र सदर महिला त्यानंतर परत तपासणीसाठी आलीच नाही. त्यांनी तपासणी न केल्याने बाळाच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. जर महिलेने सर्व तपासणी केली असती, तर बाळाच्या प्रकृतीबाबतचे निदान आधीच झाले असते. त्यामुळे एक डॉक्टर म्हणून यात कोणताही निष्काळजीपणा नव्हता, असा खुलासा डॉ. महेंद्र लोढा यांनी केला.

डॉ. लोढा यांचा राजीनामा
ग्रामीण रुग्णालयात विविध स्पेष्टलिस्टची कमतरता असल्याने रुग्णालय प्रशासन काही खासगी स्पेशलिस्ट डॉक्टरांना मानधन तत्वावर नियुक्ती करतात. अशा डॉक्टर मानवसेवी चिकित्सक म्हटले जाते. डॉ. लोढा हे ग्रामीण रुग्णायतात स्त्री रोग चिकित्सक म्हणून काम करतात. ते कुटुंब नियोजन ऑपरेशन, प्रसूतीपूर्व तपासणी इत्यादी कामे त्यांच्याकडे आहे. मात्र या प्रकरणानंतर त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पदाचा राजीनामा सुपुर्द केला आहे. वणी विभागात स्त्रीरोग चिकित्सकाची कमतरता आहे. शिवाय खासगी चिकित्सक ग्रामीण रुग्णालयात सेवा देण्यास इच्छुक नसतात. डॉ़. लोढा यांच्या राजीनाम्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील गरोदर महिलांची रुग्णसेवा प्रभावीत होऊ शकते. दरम्यान काही नागरिकांनी राजीनामा परत घ्यावा अशी विनंती देखील डॉ. लोढा यांना केली आहे.

या प्रकरणी नवजात बालकाच्या वडिलांनी सोशल मीडियावर नवजात बालकाच्या फोटोसह डॉ. लोढा यांच्याविरोधात पोस्ट व्हायरल केली. तसेच या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात व जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांच्याकडे डॉ. लोढा यांची तक्रार केली आहे. सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी सध्या हे प्रकरण मेडिकल कॉन्सिलकडे देण्यात आल्याची माहिती ठाणेदार अजित जाधव यांनी दिली. या प्रकरणात माजी नगरसेविका प्रीती बिडकर यांनी उडी घेत शुक्रवारी दुपारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन डॉ. लोढा यांच्यावर विविध आरोप केले. त्यानंतर डॉ. लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर लावण्यात आलेल्या विविध आरोपांबाबत खुलासा केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.