निकेश जिलठे, वणी: आमदार म्हणून प्रचंड लोकप्रियता, मतदारसंघात विविध विकासकामे, लाडकी बहिण पाठिशी होत्या. दोन तुल्यबळ कुणबी उभे असल्यास नॉन कुणबी उमेदवार निवडून येतो. असा वणी विधानसभेचा इतिहास आहे. मात्र भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा वणी विधानसभा मतदारसंघात 15 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला. गेल्या वेळी पेक्षा त्यांचे मतदान 12 ते 13 हजारांनी वाढले. मात्र बोदकुरवार यांना ग्रामीण भागात अपेक्षीत लीड मिळवता आली नाही. आधीच्या भागात आपण संजय देरकर यांच्या विजयाचे विश्लेषण केले होते. या भागात संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पराभवाला कोणत्या महत्त्वाच्या बाबी कारणीभूत ठरल्यात, याची चर्चा करणार आहोत.
भाजपची एकाकी झुंज
संजय देरकर यांना सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेस तसेच इतर छोट्या मोठ्या संघटनांची जबरदस्त साथ मिळाली, तर बोदकुरवार हे एकाकी लढताना दिसले. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, रिपाई (आठवले) व पिरिपा (कवाडे) गट अशी महायुती होती. मात्र या निवडणुकीत इतर मित्रपक्षांचा त्यांना कोणताही फायदा झाला नाही. शिंदे गटाचे नेते विनोद मोहितकर व ललित लांजेवार हे संपूर्ण प्रचार कालावधी बोदकुरवार यांच्या सोबत होते. मात्र परिसरात पक्षाचा विशेष जनाधार नसल्याने भाजपला त्याचा फायदा झाला नाही. हीच बाब राष्ट्रवादी अजित पवार गटालाही लागू पडली.
दलित व्होटबँक दूर
भाजपला आंबेडकर चळवळीतील पक्ष असलेल्या रिपाई (आठवले) गटाचा व पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे) गटाचा पाठिंबा होता. प्रचारात रिपाईचे वर्सुकेत पाटील हे फिरत होते. मात्र त्यांच्यामागे कोणताही जनाधार नव्हता. तर पिरिपाचे पुरुषोत्तम पाटील हे भाजपच्या प्रचारापासून दूर राहिले. त्यामुळे निळा झेंडा केवळ भाजपच्या प्रचार रॅली आणि सभेतच दिसून आला. दलित, आंबेडकरी मतदान हे महाविकास आघाडीकडे गेले.
मतविभाजन करणारे फॅक्टर ठरलेत फेल
अपक्ष उमेदवार संजय खाडे हे किमान 20 ते 25 हजार मतदान घेणार असे आधी भाकित करण्यात आले होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बोदकुरवार हे निश्चिंत होते. मात्र खाडे यांची क्रेज मतदानाच्या दिवशी पर्यंत कमी होत गेली. तसेच वंचितने गेल्या वेळी 15 हजारांपेक्षाही अधिक मतदान घेतले होते. यावेळी वंचितला कसाबसा साडेतीन हजारांचा पल्ला गाठता आला. आंबेडकरी व कुणबी मतांचे मतविभाजन टळले गेले. हे मतदान देरकर यांच्याकडे गेले. मतविभाजन न झाल्याचा बोदकुरवार यांचा मोठा फटका बसला.
मोठ्या नेत्या ऐवजी माधवी लता यांची सभा
बोदकुरवार यांच्या प्रचारार्थ भाजपच्या एकाही बड्या नेत्याची सभा झाली नाही. याऐवजी वादग्रस्त व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या माधवी लथा यांची सभा प्रचाराच्या अखेरच्या दिवशी झाली. मुस्लिम मतदान हे भाजपसोबत नसते, असे ढोबळ मानाने म्हटले जाते. मात्र बोदकुरवार यांच्या वैयक्तिक कामामुळे, लोकप्रियतेमुळे 2-3 हजारांचे मुस्लिम मतदान बोदकुरवार यांच्या पाठिशी होते. मात्र माधवी लथा येणार असल्याचे कळताच मुस्लिम मते फिरली. त्यांचे पूर्ण भाषण हे मुघल, औरंगजेब, बांगलादेशी, घुसखोर असे मुस्लिम विषयक होते. त्यामुळे बोदकुरवार यांना 2 ते 3 हजारांचा मोठा फटका बसला व हे मतदान देरकर यांच्याकडे वळले. देरकर 2-3 हजारांन प्लस झाले तर बोदकुरवार हे मायनस झाले.
निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप
संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या काळात सर्वाधिक विकासकामे झालीत. केवळ रस्तेच नाही तर इतर देखील कामे झालीत. रस्ते हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एकदा रस्ता तयार झाल्यावर 20 ते 25 वर्ष त्या कामासाठी निधी मिळत नाही. त्यामुळे हे रस्ते किमान 20 वर्षे तरी टिकावं अशी मतदारांची इच्छा असते. मात्र अवघ्या काही महिन्यातच त्यांच्या काळात तयार झालेल्या रस्त्यावर खड्डे पडले. त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. त्यामुळे त्यांच्या विकासपुरुष या प्रतिमेला काही प्रमाणात छेद गेला. शिवाय विकासकामे हे केवळ एकाच पट्टयात दिसून येत होते. दुस-या पट्टात विकास कामांचा अभाव होता. नांदेपेरा रोडवरील एका गल्लीत तर आधीचा सिमेंट रस्ता सुस्थितीत असताना त्यावर पुन्हा रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे ज्या भागात कामे झाले नाहीत. त्या भागातील मतदार नाराज होते.
कंत्राटदारांशी जवळीकता
वणीतील एक मुख्य रस्ता तयार करण्यात आला. मात्र सर्व अटी व शर्तीचे पालन न करता हा रस्ता तयार होत असल्याचा आरोप झाला. मीडियात हे प्रकरण गाजल्यानंतर पेवर मशिन आणून अर्धा रस्ता तयार करण्यात आला. एकाच कंत्राटदाराला अधिकाधिक कामे मिळत होते. कंत्राटदाराशी असलेल्या जवळीकतेतून हे सर्व होत असल्याचे आरोप बोदकुरवार यांच्यावर सातत्याने व्हायचे. सोबतच कंत्राटदार व आमदार यांनी एकत्र संपत्ती घेतल्याचा मुद्दा देखील शहरात चांगलाच चर्चीला गेला. याचे कधीही स्पष्टीकरण आले नाही. कंत्राटदाराशी असलेली जवळीकता त्यांना घातक ठरली. यासह अनेक कार्यकर्त्यांना कंत्राटदार करून त्याचे कंत्राट कोणताही अनुभव नसणा-या या कार्यकर्त्यांना देण्यात आले. यामुळे कार्यकर्ते तर खूश होते. मात्र काही ठिकाणी निकृष्ट कामे झाल्याचा आरोप झाला व मतदारांमध्ये बोदकुरवार यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला. हा मुद्दा निवडणुकीच्या काळात मनसेने अधिक उचलून धरला होता.
‘ते’ कथित वक्तव्य
निवडणुकीच्या प्रचाराला नुकतिच सुरुवात झाली होती. भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी बोदकुरवार यांच्या एका समर्थकाने एका विशिष्ट समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप झाला. या कथित वक्तव्यावरून त्या कार्यकर्त्याला मारहाण देखील करण्यात आली. ही घटना वा-यासारखी पसरली. विदर्भात अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षाने हा मुद्दा व्यवस्थित कॅश करीत त्याला चांगलीच पब्लिसिटी दिली. त्यामुळे या समाजाचे मतदान काही प्रमाणात बोदकुरवार यांच्यापासून तुटून ते देरकर यांना मिळाले.
भाजपच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची अलिप्तता
विजय चोरडिया यांनी वेळोवेळी केलेली मदत व विविध हेल्थ कॅम्पद्वारा ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क तयार केला होता. तसेच बजरंग दल सारख्या संघटनेची तरुणांची फौज त्यांच्या पाठिशी आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष असलेले तारेंद्र बोर्डे यांचा कुणबी समाज व तरुणांमध्ये चांगला क्रेझ आहे. मात्र हे दोन्ही नेते केवळ सभेपुरते मर्यादित राहिले. तारेंद्र हे पाठिशी असते तर बरेच कुणबी मतदान फिरले असते, अशी चर्चा आता शहरात रंगत आहे. शिवाय बोदकुरवार यांनी देखील अप्रत्यक्षरीत्या तारेंद्र यांच्यावर काम न केल्याचा आरोप केला होता. तर विजय चोरडिया यांनी बोदकुरवार यांनीच प्रचाराला येण्याऐवजी घरून फोन करून प्रचार करण्याचे सांगितल्याची माहिती वणी बहुगुणीला दिली.
लाडकी बहिणीला भारी पडला शेतमाल भाव
बोदकुरवार यांना लाडकी बहिणीची अपेक्षीत साथ मिळाली. गेल्या वेळी पेक्षा त्यांचे सुमारे 12 ते 13 हजारांनी मतदान वाढले. मात्र ग्रामीण भागात त्यांना अपेक्षीत लीड मिळाली नाही. बोदकुरवार यांना 25 पैकी केवळ 8, 9, 10, 11, 14, 21 व 22 या सात फेरीतच आघाडी मिळाली. यातील 10 व्या फेरीतलीच आघाडी ही दीड हजारांपेक्षा अधिकची होती. ग्रामीण भागात देरकर यांनी लीड घेतली. ग्रामीण भागात बोदकुरवार यांना अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामीण भागात बोदकुरवार यांना मतदान कमी होण्यात सर्वात मोठा वाटा हा शेतकरी, शेतमजुर मतदारांचा होता. सोयाबिन व कापसाला मिळालेला अल्प भाव हा यास कारणीभूत ठरला. ही तुट लाडक्या बहिणींना भरून काढता आली नाही.
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964
Comments are closed.