संतप्त महिलांनी जाळला धाबा, निलगिरी बनजवळील घटना

मंदर येथील महिलांचा अवैध दारूविक्रीविरोधात एल्गार, धाबाचालकाला चोप देत धाब्याची नासधूस

विवेक तोटेवार, वणी: अवैध दारू विक्रीविरोधात मंदर येथील महिलांनी एल्गार पुकारत धाब्याला आग लावली. तसेच धाबा चालक व धाब्यातील एका सहका-याला बेदम चोप दिला. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास वणी-घुग्घुस रोडवर निलगिरी बन जवळ ही घटना घडली. वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी धाब्यावर हल्लाबोल केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समोर आल्याने तालुक्यात राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध दारु विक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

प्राप्त माहिती नुसार, वणी घुग्घुस हायवेवर निलगिरी बनाच्या पुढे ‘बाबूभैया का धाबा’ नामक धाबा आहे. या धाब्यावरून दारूची अवैधरित्या विक्री सुरु होती, असा महिलांचा आरोप आहे. गावातील अनेक तरुण मुलं दारूच्या आहारी गेले. याबाबत महिलांनी अनेकदा धाबा मालकाला समज दिली. मात्र धाबा मालकाने याकडे दुर्लक्ष केले. तीन दिवसांपूर्वी मंदर येथील महिलांनी याबाबत तक्रार दिली. त्यानंतर महिलांनी वाट पाहिली. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आज मंगळवारी दिनांक 20 ऑगस्ट रोजी संतप्त महिला एकत्र आल्यात. सुमारे 30 ते 40 महिलांनी सकाळी 10 वाजताच्या सुमारास धाब्यावर हल्लाबोल केला. त्यांनी धाब्याची तपासणी करत लपवून ठेवलेल्या दारू, पाणी, कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्स बाहेर काढून रस्त्यावर ठेवल्या व संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संतप्त महिला एवढ्यावरच थांबल्या नाही. त्यांनी धाबाचालक व धाब्यातील एका सहका-याला बेदम मारहाण केली. त्यानंतर महिलांनी धाब्याला आग लावली. या आगीत धाब्यातील पाण्याची टाकी, काउंटर टेबल, ग्रीन शेड, बल्ली इ. वस्तू जळाल्या. सोबत धाब्यात असलेले भांडे, रॅक, खुर्ची, टेबल इत्यादींची नासधूस केली. महिलांनी वणी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलांनी दोन्ही आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले.

हा धाबा हायवेवर आले. त्यामुळे घटनेच्या वेळी ये-जा करणा-या बघ्यांची येथे चांगलीच गर्दी झाली होती. यावर सध्या पोलिसांतर्फे तक्रार नोंदवणे सुरु आहे. या घटनेमुळे तालुक्यातील राजरोसपणे अवैधरित्या सुरु असलेल्या अवैध दारू विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

धाडसी दरोडा…. चाकूचा धाक दाखवून व्यावयासिकाला लुटले

Comments are closed.