अनिल मेश्रामची जिल्हा कारागृहात रवानगी
ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुक्यातील हिवरी येथील एका मारहाण प्रकरणी न्यायालयात गैर हजर असल्याने विना जमानती वारंट बजावण्या साठी गेलेल्या मारेगाव पोलीस पथकावर हल्ला करुन येथील स. पोलीस उपनिरीक्षक राजेन्द्र कुडमेथे यांचा खून झाला होता. या प्रकरणातील आरोपी अनिल मेश्रामला तब्बल २१व्या दिवशी अटक करण्यात आल्या नंतर त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. आता त्या नंतर १८ डिसेंबरच्या सायंकाळी साडेसहा वाजता त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील एका महिलेला मारहाण केल्या प्रकरणात येथीलच आरोपी अनिल मेश्राम याच्या विरोधात मारेगाव न्यायालयात प्रलंबीत होते. प्रकरणात अनिल हा सतत गैरहजर असल्याने न्यायालयाने मारेगाव पोलीसानी न्यायालयाला सहकार्य करावे असे फर्मान काढुन विना जमानती वारंट बजावले होते. मात्र मारेगाव पोलीसपथक विना जमानती वारंट बजावण्यासाठी अनिलच्या घरी गेल्यावर आरोपी अनिल मेश्रामने हल्ला करून येथीलच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेन्द्र कुडमेथे यांना जागीच ठार केले.
या घटनेनंतर आरोपी अनील मेश्राम पसार होण्यात यशस्वी झाला होता. तब्बल घटनेच्या २१ व्या दिवशी पोलीसाना त्याला अटक करण्यात यश आले. या प्रकरणात त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर वणी न्यायालयाने त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. घटनेचा पुढील तपास न्यायालय कोठडीतून सुरु राहणार आहे.