जितेंद्र कोठारी, वणी : रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडुन कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 50 हजाराची लाच घेणाऱ्या एका मंडळ अधिकाऱ्यांसह 2 तलाठी व एक पोलीस कर्मचाऱ्याला अमरावती परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली. मंडळ अधिकारी बाबुसिंग राठोड, तलाठी रमेश राणे, तलाठी नमो सदाशिव शेंडे असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. एसीबी कारवाईचा सुगावा लागताच आरोपी पोलीस कर्मचारी संजय खांडेकर हा फरार झाल्याची माहिती आहे. चारही आरोपी विरुध्द मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातून मुकुटबन येथे रेतीची वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला 23 सप्टे. 2022 रोजी मुकुटबन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी संजय खांडेकर यांनी आरसिसिपीएल कंपनीचे बाहेरील गेटजवळ अडवून चालकाकडून रॉयल्टी हिसकावली. तसेच महसूल अधिकाऱ्यांना माहिती देऊन बोलाविले. माहितीवरुन मुकुटबनचे मंडळ अधिकारी बाबुसिंग किसन राठोड, मूकुटबन साजाचे तलाठी रमेश फकिरा राणे, खातेरा साजाचे तलाठी नमो सदाशिव शेंडे यांनी ट्रक मालकाला कारवाईची भीती दाखवून तडजोडीअंती 50 हजार रुपयांची मागणी केली. ट्रक मालकांनी नाईलाजास्तव 50 हजार रुपये लाच देणे कबूल केले. मात्र त्यांना लाच देणे कबूल नसल्यामुळे मोबाईलवर झालेले तडजोडीचा संभाषण त्यांनी रेकॉर्डिंग करून लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून गुरुवार 16 फेब्रुवारी 2023 रोजी आरोपी लोकसेवक मुकुटबनचे मंडळ अधिकारी बाबुसिंग किसन राठोड(53), मूकुटबन साजाचे तलाठी रमेश फकिरा राणे(48), खातेरा साजाचे तलाठी नमो सदाशिव शेंडे (38) व पोलीस कर्मचारी संजय रामचंद्र खांडेकर (38) यांना मुकुटबन येथून अटक केली. सर्व आरोपीविरुद्ध मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
सदरची कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे पोलीस अधीक्षक मारोती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अरुण सावंत, देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक, शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (ला. लु.प्र.वि. यवतमाळ) ज्ञानेश्वर नालट, पोलीस अंमलदार सचिन भोयर, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, महेश वाकोडे, चालक संजय कांबळे यांनी केली.
नागरीकांना आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे खालील नंबरवर संपर्क साधावा.
दुरध्वनी क्रं – 07232-244002
टोल फ्रि क्रं 1064
मोबाईल क्र. 9657717329
Comments are closed.