अर्जनविसाने केली शेतकऱ्याची फसवणूक, विकली जमीन
खोट्या सह्याद्वारे शेतकऱ्याच्या जमिनीची परस्पर विक्री
विवेक तोटेवार, वणी: लोक विश्वास टाकून आपले कागदपत्र संबंधीत लोकांकडे देतात. मात्र असे कागदपत्र सादर करणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले. या कागदपत्राच्या आधारे चक्क परस्पर जमीन विक्रीचा प्रताप उघड झाला आहे. एका शेतकऱ्याने आपल्या जमिनीचे कागदपत्र एका अर्जनविसाकडे दिले होते मात्र त्या आधारे च्या अर्जनविसाने त्याची जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली. याबाबत अर्जनविसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घुलाराम उर्फ विलास महादेव वासेकर (50) हे साखर दरा येथील रहिवाशी आहे. यांच्या नावे खेकडी गावात 33/3 84 आर जमीन आहे. सोबतच त्यांची चिलई येथे गट क्रमांक 74 येथे 1 हेक्टर शेती आहे. अचानक आलेल्या आर्थिक अडचणीमुळे त्यांनी यांनी 2 एप्रिल 2018 ला खेकडी येथील जमीन पांडुरंग रामकृष्ण शेंडे यांना विकली. या जमिनीची विक्री व फेरफार झालेला आहे.
दीड महिन्यानंतर 15 मे 2018 रोजी विलास यांना केळापूर येथील दिवाणी कनिष्ठ न्यायालयाची नोटीस मिळाली. या नोटीसमधून त्यांना चिलई येथील जमीन दुसऱ्या व्यक्तींना विकल्याचे कळले. मात्र त्यांनी ती जमीन विकलीच नव्हती. या नोटिसमध्ये विलास व्यतिरिक्त 6 जणांना न्यायालयात हजर राहावयाचे होते. सदर नोटीस ही दादाजी सदू निखाडे राहणार अडेगाव यांनी पाठविली होती.
सदर जमिनीचे कागदपत्र हे खेकडी येथील शेतीच्या विक्रीच्या वेळी अर्जनविस सतीश कुंडलिक केराम राहणार मंगलम पार्क चिखलगाव यांना दिले होते. सतीशने या कागदपत्रांचा दुरुपयोग करून व विलास वासेकर, कवडू दामोदर तेजे व अशोक वासेकर यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून दादाजी निखाडे यास विकली असे विलास यांच्या लक्षात आले.
विलास यांची खेकडी येथील विक्री केलेल्या जमिनीचे कागदपत्र घेऊन अर्जनविसानी घुलाराम यांना चिलई येथील जमीन विकल्याचे विलास यांना लक्षात आले. आपली दिशाभूल व फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली.
त्यांच्या तक्रारीवरून दादाजी सदू निखाडे व अर्जनविस सतीश कुंडलिक केराम यांच्याविरुद्ध कलम 420, 468, 471, 182, 34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी विजयमाला रिठे करीत आहे.