मुकुटबन येथील आरोग्य शिबिरात 950 रुग्णांची तपासणी

झरी तालुक्यातील रुग्णांचा सहभाग, रुग्णांना मोफत औषधोपचार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गणेशोत्सव, गौरीपूजन व ईद ए मिलाद निमित्त मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोमवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 950 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. खा. प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात हे शिबिर घेण्यात आले. काँग्रेसचे प्रदेश कमिटी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

शिबिराच्या उद्घटन प्रसंगी बोलताना वामनराव कासावार म्हणाले की झरी तालुका हा मागास आहे. या ठिकाणी आवश्यक ती आरोग्य सुविधा अद्यापही नाही. त्यामुळे रुग्णांना चांगल्या उपचारासाठी वणी किंवा इतर ठिकाणी जावे लागते. परिसरातील गोरगरीब रुग्णांना शिबिराचा मोठा लाभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले. आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या मोठी आहे. अनेकदा रुग्ण मोठ्या ठिकाणी जाऊन उपचार करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले, असे मनोगत यावेळी डॉ. लोढा यांनी व्यक्त केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या महाआरोग्य शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, रोग निदान, ईसीजी, रक्त तपासणी, बीएमडी तपासणी केली गेली. आवश्यकता असलेल्या रुग्णांना मोफत प्राथमिक औषधी वितरण करण्यात आले. शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, सर्जरी तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, कान, नाक व घसा तज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी व उपचार केलेत. शिबिराच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसचे झरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लोढा हॉस्पिटलच्या चमुने परिश्रम घेतले.

वणीत 15 सप्टें. व मारेगावात 21 सप्टें.ला शिबिर
रविवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी वणी येथील लोढा हॉस्पिटल येथे सुपरस्पेशालिटी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर शनिवारी 21 सप्टेंबर रोजी मारेगाव येथील लोढा हॉस्पिटल येथे महाआरोग्य शिबिर होणार आहे. वणी व मारेगाव येथील शिबिराचा तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.

Comments are closed.