अट्टल चोरट्याने चोरली दुचाकी, पण विकताना फुटले बिंग…

ग्राहक शोधताना अडकला पोलिसांच्या जाळ्यात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: दुचाकी चोरटा ठिकठिकाणाहून दुचाकी चोरी करायचा. त्यानंतर तो ग्राहक शोधून त्यांना चोरीची दुचाकी अत्यल्प दरात विकायचा. चोरी करताना अलगद निसटणारा चोरटा मात्र दुचाकी विकताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. विकण्याच्या प्रयत्नात असलेली दुचाकी ही मारेगाव येथून चोरली होती. यासह त्याच्याकडून भालर येथून आणखी 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या. ज्याची किंमत सुमारे पावने दोन लाख रुपये आहे. गणेश पांडुरंग कुडमेथे उर्फ (गणेश भाउराव घोडाम) वय 35 वर्षे, रा. इंदीरा आवास घाटी ता. घाटंजी जि. यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. मारेगाव येथील दुचाकी चोरीच्या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार असल्याने आरोपीला मारेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

सविस्तर वृत्त असे की मंगळवारी दिनांक 16 जानेवारी रोजी आरोपी हा यवतमाळ येथील पांढरकवडा रोडवरील किरण पेट्रोल पम्पजवळ होन्डा कंपनीची ड्रिम (MH-32-AN-1371) ही दुचाकी विकण्यासाठी ग्राहक शोधत होता. दरम्यान आरोपीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने खबरींनी याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिली. एलसीबीचे पथक तात्काळ या ठिकाणी गेले. तिथे त्यांना आरोपी गणेश हा आढळून आला. त्याला गाडीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नंबर प्लेटवरून माहिती काढली असता सदर दुचाकी मारेगाव येथून चोरी झाल्याचे त्यांना कळले. आरोपीचे बिंग फुटले होते.

आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने आणखी चार दुचाकी वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरल्या असून सध्या त्या वणीजवळील भालर येथे ठेवल्याची माहिती त्याने दिली. त्यावरून पोलिसांनी भालर येथून आणखी चार दुचाकी जप्त केल्या. त्याच्यावर मारेगाव येथे आधीच भादंविच्या 379 नुसार गुन्हा दाखल होता. त्यामुळे आरोपीला मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक एलसीबी यांच्या मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधिर पांडे, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके यांच्यासह स्थागुशा यवतमाळ यांनी केली.

संजय देरकर… संघर्षाच्या वाटेवरील एक लढाऊ योद्धा

Comments are closed.