कोरोनाशी लढण्याच्या काळात….

वणीतील सौ. शुभलक्ष्मी मनोज ढुमे यांचा अंतर्मुख करणारा अनुभव...

0

कोरोनाशी लढण्याच्या काळात…

– सौ. शुभलक्ष्मी मनोज ढुमे, वणी

एका कुटुंबात सगळे सदस्य स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी घेऊन एकत्र राहतात. अचानक सुरू असलेल्या कोरोनाच्या संक्रमणाच्या त्याच कुटुंबातील एका सदस्याला कोरना संशयीत म्हणून नेण्यात येते. तेव्हा त्या कुटुंबाला इतरांच्या मदतीची किंवा सांत्वनाची अधिक गरज असेत. पण अशावेळी लोक त्यांच्याकडे संशयित नजरेने बघतात. त्या कुटुंबापासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करतात. तसे पाहता ती व्यक्ती कोरोना रुग्ण नसतेच तर ती फक्त संशयीत असल्याने त्या व्यक्तीला नेण्यात आले असते. कोरोना बाधीत रुग्णाचा थोडा जरी संपर्क आला तरी त्यापासून संसर्ग होऊ नये याची खबरदारी म्हणून ही काळजी घेतली जाते. त्या व्यक्तीची टेस्ट निगेटीव्ह आलेली असते. मात्र तरीही ही त्या व्यक्तीकडे लोक संशयाच्या नजरेने बघतात. अशावेळी ते खरोखरच पूर्णतः माणुसकी हरवून बसलेले असतात.

समजा एखाद्या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉजिटिव्ह आला तरी याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती कधीच बरी होणार नाही. ज्याची रोग प्रतिकारशक्ती कमी असते असेच रुग्ण दगावण्याची भीती अधिक असते. बहुतेक लोकांना तर या आजाराची लक्षणे सुद्धा आढळून येत नाही. खरोखरच या आजारातून मुक्तता हवी असेल तर आपल्याला आपले विचार बदलावे लागेल. आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपली दैनंदिन कामे करत राहिलो तर आपल्याला काही होणार नाही.

समजा भविष्यात कोरोना झालाच तर आपल्या सगळ्यांना हे माहिती असायला हवे की हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. पूर्ण झालेल्या रुग्णांना सुद्धा दवाखान्यात फक्त ताप उतरवण्याच्या गोळ्या, दोन तासांनी कोमट पाणी आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या औषधी दिली जाते. यातील केवळ दहा टक्के लोकांनाच ऑक्सिजनची गरज असते.

स्वाइन फ्ल्यू, डेंग्यू या आजारासारखाच हा आजार आहे आणि तो बरा सुद्धा होऊ शकतो, परंतु लोकांनी याबाबत स्वतःच्या मनामध्ये याची इतकी भीती निर्माण करून घेतली की कोरोना झाला म्हणजे सर्व काही संपले. जर नकारात्मक विचार काढून आपण जर इतरांशी माणूस या नात्याने वागलो किंवा सकारात्मक विचार ठेवून आपला दृष्टिकोन बदलवला तर खरोखरच या आजारातून सुद्धा आपल्याला मात करता येणे सहज शक्य आहे. परंतु सध्यातरी आपण त्या मनस्थितीत नाही असेच दिसून येत आहे.

एखाद्या व्यक्तीला कॉरन्टाईन केले असेल तर त्याच्यासाठी संपर्काचे सर्व दरवाजे बंद करू नका. लांबून सुद्धा त्या व्यक्तीला तुम्ही प्रेम, माया देऊ शकता, सहानुभूती देऊ शकता किंवा त्यांचे सांत्वन करू शकता. तुमच्या वागण्याने रुग्णांवर कोणताही परिणाम होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेऊ शकतो. त्याला आजाराची जाणीव होऊ न देता.

माणूस गरीबी मुळे जेवढा खचत नाही तेवढा तो इतरांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे खचून जातो. कारण तेव्हा काही लोक आपले जवळचेच लोक परकेपणाची जाणीव करून देतात. ही वस्तुस्थिती आहे. कोरोना संशयीत आहे असे समजल्यावर लांब जाणारे आणि निगेटिव्ह आल्यावर फुलांचा वर्षाव करून टाळ्या वाजवायला येणारे असे अनेक लोक दरम्यान पाहायला मिळलतात. अशा लोकांपासून सावध राहा.

जेव्हा सर्व जग आपल्याला कमजोर समजू लागतं. तेव्हा आपल्यालाच आपल्या आयुष्याची लढाई जिंकायची असते. मला इतकेच म्हणायचे आहे की बहिष्कार कोरोनाचा करा. नात्यांचा, विचारांचा किंवा माणुसकीचा नाही.
– सौ. शुभलक्ष्मी मनोज ढुमे
वणी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.