पुरुषोत्तम नवघरे, वणी: सोमवार दिनांक 8 फेब्रुवारीला शहरातील सुपरिचित मूर्तीकार व पेंटर शंकर पांडुरंग दुधलकर (40) यांनी आपल्या राहत्या घरी अंगावर थिनर टाकून जाळून घेतले. त्यांना उपचारा करीत चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
सविस्तर वृत्त असे की शंकर पांडुरंग दुधलकर हे रंगनाथ नगर येथील रहिवाशी होते. अल्पावधीतच त्यांनी एक पेंटर व मूर्तीकार म्हणून परिसरात आपली ओळख निर्माण केली होती. सोमवारी दुपारी ते एका पेंटींगच्या कामासाठी गेले होते. त्यानंतर ते घरी परतले होते. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास त्यांनी घराबाहेर कुटुंबीसह चहा घेतला व ते घरात गेले.
काही वेळाने घरातून धूर येत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयाच्या निदर्शनास आले. त्यांनी आत जाऊन बघितले असता तिथे शंकरने स्वत:ला जाळून घेतले होते. कुटुंबीयांना पेंटिंगच्या कामात वापरले जाणारे थिनर टाकून त्यांनी पेटवून घेतल्याचे आढळून आले. यात ते 45 टक्के जळाल्याची माहिती आहे.
त्यांना तातडीने उपचारासाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शंकर यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा आप्त परिवार आहे.
कला क्षेत्रात हळहळ
शंकरने वयाच्या 15 व्या वर्षांपासून कला क्षेत्रात पदार्पण केले. कुणीही गुरु नसताना त्यांनी पेंटिग व मूर्तीकला क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली. सुंदर हस्ताक्षराचे धनी असलेल्या शंकरने तयार केलेल्या मूर्तीला गणेशोत्सव, दुर्गोत्सवासाठी चांगलीच मागणी होती. अलिकडे कौटुंबीक वादामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. शंकरच्या आत्महत्येमुळे परिसरात व कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हे देखील वाचा: