अशोक आकुलवार( विशेष प्रतिनिधी) वणी:चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील कांग्रेस पक्षाने दिलेली बाळूभाऊ धानोरकाराची उमेदवारी ही या मतदार संघातील सामान्य मतदाराच्या सामुहिक व प्रबळ जनरेट्याने खेचून आणलेली उमेदवारी आहे अशी प्रांजळ कबुली कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज सोमवारी एक एप्रिल रोजी वणी येथील जाहीर सभेत बोलताना दिली. ते कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुरेश (बाळू) धानोरकर यांच्या प्रचारार्थ आले होते.
यावेळी व्यासपीठावर शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, मोरेश्वर टेंभूर्डे,विजय वडेट्टीवार, वामनराव कासावार, सुभाष धोटे, चंद्रकांत हंडोरे, डॉ. महेंद्र लोढा, नसीम खान, देविदास काळे, विवेक मांडवकर, पुरुषोत्तम आवारी इत्यादी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर चौफेर टिका करताना ‘अच्छे दिन’ ची विविध उदाहरणे देऊन चांगलीच खिल्ली उडवली. भाजपचा खरपूस समाचार घेताना ते पुढे म्हणाले की पाच वर्षांपूर्वी भाजपने सामान्य माणसाला फसवले व आता सामान्य माणसांना पश्चाताप होत आहे. शेतकरी आत्महत्या, किमान आधारभूत किंमत, हाताला काम नसल्यामुळे वाढत चाललेली बेरोजगारी, छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रखडलेली स्मारकं व विद्यार्ध्याचे प्रश्न अशा विविध विषयांना त्यांनी हात घातला.
भाजपने बँकांना चुना लावला असून शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचे ते यावेळी म्हणाले. जनता ऑनलाईन असून हे सरकार मात्र ऑफलाईन असल्याची बोचरी टिका करून ते म्हणाले की,-
‘माल्याने लुटी SBI,
ललित भागोडा है,
इन्होंने डुबाई PNB,
क्योंकि देश का
चौकीदर चोर हैं|’
सकाळी 11 वाजता होणारी सभा तब्बल चार तास उशिराने सुरू होऊनही गर्दी मात्र कायम होती.
आदिलाबाद-गडचांदूर रेल्वेलाईन अहिरांनी अडवली
हंसराज अहिरांचा समाचार घेताना अशोक चव्हाण म्हणाले की ही निवडणूकीची लढाई ‘राजा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता’ अशी आहे. अहिरांनी चंद्रपूर-वणीच्या विकासात अनेकदा अडधळे निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.राज्यशासनाचा पन्नास टक्के वाट असणारा आदिलाबाद-गडचांदूर रेल्वेलाईनचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री असताना केंद्रशासनाकडे पाठविला होता, परंतु पुढे केंद्रीय राज्यमंत्री झालेल्या अहिरांनी तो अळवून धरून या भागातील विकासाला खीळ मारली असाही गंभीर आरोप अशोक चव्हाणांनी केला.