पुरुषोत्तम नवघरे, वणी: येत्या काळात युवक आणि युवतीच लोकसभेचा इतिहास घडवणार आहे. या पिढीनं त्यांच्या क्षमता जाणून घ्याव्यात. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर- वणी लोकसभा निवडणुकीमध्ये नवमतदारांचे प्रमाण वाढले पाहिजे. युवकांनी मतदान प्रक्रियेत उस्फूर्त सहभाग घेऊन मतदानाचा अधिकार वापरावा असे आवाहन येथील गटविकास अधिकारी तथा नोडल अधिकारी किशोर गजलवार यांनी केले. ते येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात नवमतदारांसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
दिनांक 19 एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वणी विधानसभा क्षेत्रातील मतदानाची टक्केवारी वाढावी. यासाठी मतदार जाणीवजागृती अभियानांतर्गत सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम सुरू आहेत. या अतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये नवमतदारांशी संपर्क साधून युवकांची मतदानातील टक्केवारी वाढवण्यासाठी उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून येथील टिळक महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात किशोर गज्जलवार यांनी उपस्थित महाविद्यालयीन युवकांना लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्व समजावले.
लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाचा आपला अधिकार वापरणे किती महत्वाचे आहे हे पटवून दिले. हे समजावून सांगत मी मतदान करणार हा निर्धार व्यक्त करण्यासाठी घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत या नवमतदारांनी स्वाक्षरी करून मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
Comments are closed.