अखेर अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात

टिळक चौक ते यवतमाळ रोडवरचे अतिक्रमण हटवले, उद्या वरोरा रोडची कारवाई

विवेक तोटेवार, वणी: आज सकाळ पासून नगर पालिकेच्या अतिक्रमण मोहिमेला सुरुवात झाली. या आधी 3-4 वेळा ही मोहीम काही ना काही कारणावरून पुढे ढकलण्यात आली होती. शेवटी जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना दिले. त्यांनी संबंधित सर्व विभागाशी संपर्क करून ही मोहीम राबविली. आज ही मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेल्या जागेवर राबविब्यात आली. तर पोळ्यानंतर नगर पालिका हद्दीतील अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

आज सकाळी 9 वाजता टिळक चौकपासून अतिक्रमण काढण्यास सुरूवात झाली. व्यावसायिकांनीही याला सहकार्य करीत आपले अतिक्रमण आधीच काढून घेतले. दिवसा अखेर यवतमाळ रोडवरील वेलकम मॉल पर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले. तर उद्या बुधवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत चे अतिक्रमण काढले जाणार आहे. पोळा झाल्यानंतर ही मोहीम वणी नगर परिषद हद्दीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये आंबेडकर चौक, भगतसिंग चौक, दीपक चौपाटी, श्याम टॉकीज इत्यादी ठिकाणचा समावेश आहे.

अतिक्रमण धारकांचा भाड्याचा व्यवसाय 
वणीच्या टिळक चौकात व्यावसायिकांनी अतिक्रमणाच्या जागेवर कब्जा केला आहे. यातील अनेक जागेवर अतिक्रमण धारक स्वतः व्यवसाय करत नाही. तर ही अतिक्रमीत जागा किरायाने देतात. या जागेसाठी 200 रुपये ते 500 रुपये रोज किराया वसूल केला जातो. अनेकदा या जागेची परस्पर विक्री देखील केली जाते. सकाळी टिळक चौकात अनेक भाजीपाला विक्रेते बंद असलेल्या दुकानासमोर आपले दुकान लावतात या भाजीपाला विकणाऱ्याकडूनही 50 ते 100 रुपये घेतल्या जात असल्याची माहिती आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.