ATM मधून रोकड लांबविणारे आंतरराज्यीय रॅकेट गजाआड

मारेगावातील एटीएममधून लंपास केली होती रोकड

0

मारेगाव: मारेगाव येथील स्टेट बँकेच्या एटीएम मधून दोन वेळा रोकड परस्पर काढून ग्राहकांना गंडा घालणा-या आंतरराज्यीय टोळीचा मारेगाव, चंद्रपूर आणि वणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमधील चार उर्वरित आरोपींची ओळख पटली असून त्या चार आरोपींना चंद्रपूर सायबर पोलिसांनी अटक केली आहे. सध्या हे चारही आरोपी मारेगाव पोलिसांच्या ताब्यात असून या चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात पाच आरोपींना अटक झाली असून पोलीस त्यांची कसून तपासणी करत आहे. याआधी पाच महिन्यांआधी अमरावती मध्ये एका संशयीत आरोपीला अटक करण्यात आली होती.

गेल्या पाच सहा महिन्यांपूर्वी मारेगाव येथील एटीएम धारक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम अचानकपणे विड्राल झाली होती. त्यामुळे ग्राहकाने बँकेत आणि पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर मारेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवेगळ्या दिशेने फिरवली. घटनेचा तपास चालू असताना मारेगाव पोलिसांनी पाच महिन्यापूर्वी अमरावती येथून पारितोष उर्फ कमल पोद्दार या संशयीताला ताब्यात घेतले होते आणि मारेगाव पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली होती. चौकशीत त्याने त्याच्या चार उर्वरित सहका-यांचे नावे सांगितली होती.

त्यावरून या चारही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. यात सध्या चंद्रपुरातील कारागृहात असलेला विशाल उमरे (३४) राहणार चंद्रपूर. हरिदास हरिविलास विश्वास (२९) मलकागिरी ओरिसा, जितेन्द्र अनिल कुमार सिंह (२५) रा. बिहार, किसन लालचंद्र यादव (२५) रा. बिहार या चार जणांना अटक करण्यात आली आहे.

ही आंतरराज्यीय टोळी एटीएममध्ये ग्राहकाच्या मागे उभे राहून पिनकोड पाहायची किंवा एटीएममधून एटीएमच्या सोळा अंकी डिजिटल अंकातील शेवटचे चार अंक मिळवत असे. त्याआधारे ते ग्राहकाचे एटीएम खाते हॅक करायचे. यातून त्यांनी ग्राहकांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे. या आरोपींना चंद्रपूर सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. सध्या अटक केलेले सायबर आरोपी मारेगाव पोलिसाच्या ताब्यात आहे.

ही कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चंद्रपूर येथील विद्यमान कोर्टातून प्रोड्यूसर वारंट करुन मारेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा ३०३/१७कलम ४२० (आय.पी.सी.आर.डब्ल्यु ६६.) आयटी अॅक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास वणी उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनखाली मुकुटबनचे पोलीस निरिक्षक गुलाबराव वाघ, मारेगावचे ठाणेदार अमोल माळवे, यांच्या देखरेखीत शिपाई सुलभ उईके, नीरज पातुरकर, किशोर आडे, महेश राठोड, प्रमोद फुपरे तपास करीत आहे. एटीएम मधून लंपास झालेली रोकड़ त्या नागरिकांना मिळेल की नाही याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.