विवेक तोटेवार, वणी: शहरातील मोमीनपुरा येथे मस्जित समोर मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास वणीतील एका बिल्डरवर लाकडी स्टम्पने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बिल्डर थोडक्यात बचावला. मात्र हा हल्ला जीवे मारण्यासाठी केलेला कट असल्याचा आरोप त्यांनी केला. हा हल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याबाबत विविध चर्चेला उधाण आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, जमीर खान (39) हे वणीतील एक बिल्डर आहे. जम्मू या नावाने ते वणीत परिचीत असून त्यांचा आमेर बिल्डर ऍन्ड डेव्हलपर्स या नावाने व्यवसाय आहे. जम्मू दुपारी आपला मित्र सैय्यद आरिफ यांच्या सोबत मोमीनपुरा येथे घरी जात होते. यावेळी अब्दुल मजीद अब्दुल सत्तार (30) रा. वणी याने अचानक त्याच्या दुचाकीने (MH29 BB4053) येऊन जमीर यांची वाट रोखली. जमीर यांची वाट अडवताच त्याने त्यांच्या चेह-यावर मिर्ची पावडर फेकून मारली. परंतु डोळ्यावर चष्म्या असल्याने संपूर्ण मिर्ची पावडर डोळ्यात जाऊ शकले नाही.
तर जम्मू यांच्या सोबत असलेल्या मित्राच्या डोळ्यात ही मिर्ची पावडर मोठ्या प्रमाणात गेली. दरम्यान जम्मू यांचे डोळे बंद असताना अब्दुलने क्रिकेटच्या लाकडी स्टंपने त्यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर व सैय्यद यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर हल्ला केला.
हल्ला हा ‘सुपारी’चा भाग ?
हल्ला होताच परिसरातील लोकांनी गर्दी केली. गर्दी झाल्याचे पाहताच आरोपी अब्दुलने तिथून पळ काढला व जाताना पुन्हा बघून घेईल अशी धमकी दिली. आरोपीजवळ गुप्ती होती त्यामुळे हा जिवे मारण्याच्या ‘सुपारी’चा प्रकार असल्याचा आरोप जम्मू यांनी केला. तर या हल्ल्यात एका मटका व्यावसायिकाचा हात असल्याची चर्चा वणीत रंगत आहे.
या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले. आरोपी अब्दुल याच्यावर भादंवि कलम 341, 324, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीर यास पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. वृत्त लिहितपर्यंत आरोपीस अटक करण्यात आली नव्हती. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.