बापाचा प्रयत्न बेवड्याला टाळण्याचा, मुलानं प्रयत्न केला जाळण्याचा

दारुच्या नशेत आपल्या बापाचाच जीव घ्यायला निघाला मुलगा

बहुगुणी डेस्क, वणी: दारू माणसाला कोणत्या स्तरावर नेऊ शकते, याचा अंदाजच बांधू शकत नाही. दारूच्या नशेत तर रक्ताच्या नात्यांचाही विसर पडतो. एकमेकांचे जीव घ्यायलाही दारुडे मागंपुढं पाहत नाही. सानेगुरुजी नगरातील दारुड्यानं माणुसकीला कलंक फासण्याचा प्रयत्न केला. बापानं पैसे दिले नाहीत म्हणून चक्क बापालाच पेट्रोलनं पेटवण्यासाठी तो अंगावर धावून आला. तेवढ्यात काहीतरी वेगळं झालं. त्या बापाचा जीव जाता जाता वाचला. ही घटना साने गुरुजी नगरातील. तिथं सेवानिवत्त अशोक महादेव चटकी वय (62) राहतात. त्यांच्याच मुलानं हे दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला.

तक्रारीनुसार, अशोक महादेव चटकी (62) यांचा मुलगा राहुल अशोक चटकी (32) दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला. तो नशेत आपल्या वडलांना शिविगाळ करायचा. विविध खोटे कारणं सांगून पैशांची मागणी करायचा. वाट्टेल ते बोलायचा. मात्र सोमवार दिनांक 28 एप्रिलला दुपारी 4च्या सुमारास तर राहुलने हद्दच केली. राहुल दारुच्या नशेतच घरी आला. त्याचे वडील अशोक चटकी घरीच होते. राहुलने त्याच्या मुलीच्या अॅडमिशनसाठी 20 हजार रूपयांची मागणी केली. अशोक चटकी यांना त्याला पैसे देण्यास नकार दिला. राहुल लगेच संतापला. तडक अंगणात गेला. तिथं त्याच्या वडलांची क्रमांकाची पॅशन प्रो (MH 29-BZ-8285) मोटर सायकल उभी होती. राहुलने त्या बाईकवर पेट्रोल टाकलं.

हातात माचिसची काडी घेऊन तो गाडी पेटवायला निघाला. तोच वडलानं त्याला रोखलं. राहुलनं पुन्हा शिविगाळ सुरू केली. आपल्याच जन्मदात्याला थापडा व बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. पुन्हा पैशांची मागणी करू लागला. स्वयंपाकखोलीतलं गॅस सिलिंडर बाहेर काढलं. वडलांना, बाईकला व गॅस सिलिंडरला पेटवण्याची धमकी दिली. राहुलचा हा तमाशा अंगावर बेतणार असल्याचं शेजाऱ्यांच्या लक्षात आलं. ते त्वरीत धावून आलेत. त्यांनी राहुलला थांबवलं. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.

मात्र उलट राहुलच त्यांच्यावर खवळला. त्यांना शिवीगाळ करू लागला. जिवानिशी मारण्याची धमकी देऊ लागला. हे प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच फिर्यादी अशोक चटकी यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार आरोपी राहुल चटकीवर कलम 115(2), 287, 351(2), 351(3), 352, BNS 2023 अन्वये गुन्हे दाखल झालेत. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.