कोळशी-वेळाबाई-मुकुटबन परिसरात लाल परीचा संचार सुरू
प्रलंबित प्रश्न सुटला, राजूरा ते मुकुटबन व्हाया कोरपना बस सुरू
बहुगुणी डेस्क, वणी: जग चंद्रावर, मंगळावर पोहचलं. मात्र एस. टी. बस अनेक गावांमध्ये अजूनही पोहचली नाही. गेल्या काही काळापासून परिसरातील कोरपना, कोळशी, वेळाबाई, भाटा, मोहरा, नेरड, पुरड मार्गे मुकुटबनकडे जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळ म्हणजेच एस.टी.ची बससेवाच नव्हती. त्यामुळे सर्वांचीच गैरसोय व्हायची. नागरिकांची ही अडचण सामाजिक कार्यकर्ते मुक्तानंद भोंगळे, राहुल पावडे, धीरज भोयर, संदेश शंभरकर यांनी जाणली. त्यांच्या प्रयत्नांतून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आगारामार्फत नवी बस सेवा सुरू करण्यात आली.
या मार्गावर अनेक लहान-मोठी खेडी येतात. नागरिकांना शासकीय कामांसाठी, शिक्षणासाठी, तसेच आरोग्यसेवेसाठी तालुका ठिकाणी दररोज ये-जा करावी लागते. मात्र सार्वजनिक प्रवासाचं कुठलंच सुरक्षित, अधिकृत व सोयीचं साधन नव्हतं. या मार्गावर एस. टी. बस आपली सेवा देण्यास असर्थ ठरली होती. बससेवेअभावी विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना व सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
सामाजिक कार्यकर्ते मुक्तानंद भोंगळे, राहुल पावडे, धीरज भोयर, संदेश शंभरकर यांनी ठोस पावलं उचललीत. आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे बस सेवेच्या मागणीचं निवेदन दिली. त्याचा पाठपुरावा केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. या मागणीची दखल घेत आमदार देवराव भोंगळे यांनी घेतली. त्यांनी ही बससेवा सुरू करण्याचे लेखी आदेश लगेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर यांना दिलेत.
त्यानुसार ही बस दररोज सकाळी 8.00 वाजता राजुरा येथून गडचांदूर, कोरपना, कोळशी, वेळाबाई, भाटा, मोहरा, नेरड, पुरड मार्गे मुकुटबनकडे रवाना होईल. तसेच सकाळी 10.00 वाजता ही बस पुन्हा राजुराकडे परत जाईल. ही बस सेवा सुरू झाल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे मनापासून आभार मानलेत.



Comments are closed.