साई मंदिर चौकात ऑटोरिक्शा चालकांची मनमानी, वाहतुकीस अडथळा
वाहतूक पोलीस दुचाकी चालकांचे चालान फाडण्यात गुंग
जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत साई मंदिर चौक ते नांदेपेरा मार्गावर वेड्यावाकड्या आणि बेशिस्तपणे उभ्या राहणारे ऑटोरिक्शांमुले या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना नागरिकांना तसेच वाहन चालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र वाहतूक पोलिसांकडून सदर अवैध प्रवासी वाहतूक रिक्शांवर कोणतीही प्रकारची कार्यवाही होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यवतमाळ रोड ते नांदेपेरा मार्गाच्या टर्निंगवर थेट रस्त्यावर एका पाठोपाठ एक ऑटोरिक्शा उभे राहत असून दोन्ही बाजूच्या वाहन चालकांना विरुद्द दिशेने येणारे वाहन दिसत नसल्यामुळे या जागी वाहनांची समोरा समोर टक्कर होऊन किरकोळ अपघात घडत आहे. रस्त्याच्या मधात ऑटो उभे करून चेंगडबाजी करणारे रिक्शा चालकांना सामान्य नागरिकांनी ऑटोरिक्शा रस्त्याच्या बाजूला लावण्याची समज दिल्यास ऑटोचालकांकडून हुज्जत घालून दादागिरी केली जात आहे.
याच जागेवर बाळासाहेब ठाकरेच्या पुतळ्यासमोर तसेच अक्वाटासॅ बँकेसमोर रस्त्याच्यावर फळ भाजी, मिरची, कांदे विक्रेते व ठेलेवाल्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. ज्यामुळे सदर रस्ता अरुंद झाला आहे. विशेष म्हणजे टर्निंगवर असलेले लिंबाच्या झाडाखाली पोलीस वाहन उभे करून वाहतूक पोलीस दुचाकी चालकांचे चालान फाडत असताना त्यांच्या नजरेसमोर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे ऑटोवाल्यांवर पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही.
अवैध प्रवासी वाहतूक वाहन तसेच ऑटो रिक्षांना राजकीय पाठबळ तसेच वाहतूक पोलिसांचे ऑटोरिक्षा चालकांसोबत हितसंबंध असल्यामुळे ठोस कार्यवाही होत नसल्याची ओरड नागरिकाकडून होत आहे.
नांदेपेरा रोड टर्निंगवर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथला निर्माण करणारे ऑटोरिक्शा बाबत सदर प्रतिनिधी यांनी दूरध्वनी वरून वाहतूक शाखेत तक्रार केली असता स.पो.नि. संग्राम ताटे यांनी “तुम्ही येताना आम्हाला रस्ता मोकळा ठेवावा लागेल’ असे उद्धट भाषेत प्रत्युतर दिले. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्याची जवाबदारी ज्यांच्यावर आहे तेच अवैध प्रवासी वाहतुकीस खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे.