परिसरातील ऑटोरिक्षा चालक चिंताग्रस्त

हप्त्यासाठी खासगी फायनान्सचा तगादा

0

जब्बार चीनी, वणी: मागील महिनाभरापासून लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील जवळपास दहा हजार ऑटोरिक्षांची चाके थांबली आहेत. यातील दोन हजार ऑटोरिक्षा हे वणी उपविभागात आहे. केवळ उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या व्यवसायातील चालकांची आता परवड होत आहे. लॉकडाऊन कधी उघडणार आणि कधी व्यवसाय करून दोन पैसे हाती पडणार, याची चिंता आता रिक्षा चालकांना लागली आहे. त्यातच खासगी फायनान्सने ईएमआयसाठी तगादा लावण्याने कमाई नसताना ईएमआय कसा भरावा हा प्रश्न ऑटोचालकांसमोर उभा ठाकला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दुस-या टप्प्यात केलेले लॉकडाऊन 3 मे रोजीपर्यंत होते. आता ते वाढवून 17 मे पर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवडाभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत राज्यभरात वाढ होत चालली आहे. आँरेन्ज झोन मध्ये गेलेल यवतमाळ जिल्हा पुन्हा रेड झोनमध्ये गेल्याने इथले लॉकडाऊन कधी संपणार, याची चिंता सर्वांनाच भेडसावत आहे.

वणी, मारेगाव व झरी तालुक्यात खासगी व परवानाधारक ऑटोरिक्षांची संख्या दोन हजारांवर आहे. यातील सुमारे 90 टक्के ऑटोरिक्षाचालकांनी कर्ज काढून रिक्षा घेतली आहे. यातील बहुतांश लोकांचे कर्ज फिटणे बाकी आहे. एक तर धंदा बंद आहे. दीड महिन्यांपासून कमाई नाही. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होतोय. त्यामुळे आणखी 15 दिवस तरी लॉकडाऊन उघडणार नाही. त्यामुळे शासनाने आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षा चालकांनाही मदत करावी, अशी मागणी होत आहे.

प्रातिनिधिक फोटो

ऑटोरिक्षा चालकांना खासगी फायनान्स कंपनीचा तगादा
ऑटोरिक्षा खरेदी करीत असताना काही ऑटो चालकांनी खाजगी फायनान्सद्वारे कर्ज घेतले आहे. शासनाने तीन महिन्यापर्यंत कर्जाच्या हप्त्याची वसुली करू नये, असे आदेश दिलेले असतानाही खासगी फायनान्सकडून पैशाची मागणी आहे. एक तर व्यवसाय नाही, लाकडाऊन झाल्यापासून एक दिवसही ऑटो बाहेर नाही. त्यामुळे कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न आहे. त्यातच आता लॉकडाऊन वाढल्याने जगायचे कसे असा प्रश्न उभा असतानाच फायनान्सवाले हप्ता चुकवण्यासाठी तगादा लावत आहे. यावर शासनाने काहीतरी तोडगा काढावा – फारूक शेख. ऑटो चालक

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.