वणीत 29 ऑगस्टला ‘आझादी की दौड’ स्पर्धेचे आयोजन

लोकमान्य टिळक महाविद्यालयतून होणार स्पर्धेला सुरुवात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील शिक्षण प्रसारक मंडळ व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विदर्भस्तरीय ‘आझादी की दौड’ स्पर्धेचे आयोजन दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी सात वाजता केले आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालयात विजय मुकेवार यांच्या हस्ते तर आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. 

साडे चार किलोमीटर दौड असणारी ही स्पर्धा दोन गटांत होणार आहे. ‘अ’ गटात १० वर्षावरील ते १५ वर्षांआतील वयोगटातील मुले व मुली असे दोन विभाग आहेत. प्रत्येक विभागात प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये रोख तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख ही पारितोषिके, मेडल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

‘ब’ गट १५ वर्षांवरील सर्वांसाठी खुला असून या गटात १५ वर्षांवरील मुले व मुली असे दोन विभाग आहेत. प्रत्येक विभागात प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये रोख तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख ही पारितोषिके, मेडल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. सर्व वयोगटातील पहिल्या तीन खेळाडूंना सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र तसेच सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धा संपल्यानंतर तात्काळ विजेत्यांना बक्षिस वितरण केले जाईल. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विदर्भातील क्रीडासंस्थांनी सहकार्य करावे – विजय मुकेवार
आज मैदानी खेळांचे महत्त्व सर्वांनी समजून घेतले पाहिजे. विदर्भस्तरीय ‘आझादी की दौड’ या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्राचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विदर्भातील शाळा, महाविद्यालये आणि क्रीडा संस्थांनी सहकार्य करावे, जास्तीत जास्त धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांनी केले.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, उपप्राचार्य प्रा. पुरुषोत्तम गोहोकार, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद क्षीरसागर आणि वणी लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूल, ज्युनिअर अँड सिनियर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत गोडे, स्पर्धेचे मुख्य संयोजक व लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शारिरीक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक प्रा. उमेश व्यास, क्रीडा शिक्षक प्रा. कमलेश बावणे, वणी लायन्स हायस्कूल येथील क्रीडा शिक्षक किरण बुजोणे, रूपेश पिंपळकर, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयातील क्रीडा शिक्षक इंदु सिंग, अनिल निमकर, दत्तात्रय मालगडे, अरविंद गारघाटे यांचेसह दोन्ही आयोजन संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम करीत आहेत.

Comments are closed.