बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआतर्फे मूक आंदोलन

माकप तर्फे उपविभागीय अधिका-यांना निवेदन

विवेक तोटेवार, वणी: बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात वणीत मविआच्या कार्यकर्त्यांनी तोंडावर काळ्या फिती लावून महायुती सरकारचा निषेध केला. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन झाले. शहरात रिमझिम पाऊस सुरु असतानाही हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्वादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर दुपारी माकप तर्फे ॲड. कॉ. कुमार मोहरमपुरी व ॲड. कॉ. दिलीप परचाके यांच्या नेतृत्वात बदलापूर व राज्यातील इतर महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यपालांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

13 ऑगस्ट रोजी बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेने राज्यभर पडसाद पडले असून यामुळे संतापाची लाट उसळली. या घटनेत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे सरकार प्रकरण दाबत असल्याचा आरोप झाला. या घटनेच्या विरोधात शनिवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर बंदची हाक मागे घेण्यात आली. त्याऐवजी 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीतर्फे काळ्या फिती बांधून शिवाजी चौकात मूक आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संजय खाडे, टिकाराम कोंगरे, आशिष खुळसंगे, महेंद्र लोढा, प्रमोद वासेकर, अजिंक्य शेंडे, दीपक कोकस, प्रा. शंकर वऱ्हाटे, पुरुषोत्तम आवारी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकते उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

माकप तर्फे उपविभागीय अधिका-यांना निवेदन
बदलापूर, पुणे, अकोला आदी ठिकाणी शाळांमधील चिमुकल्या विद्यार्थिनींवर होणा-या अत्याचाराच्या घटना या मानवतेला काळिमा फासणाऱ्या आहेत. बदलापूर येथील घटना राजकीय दबावापोटी दाबण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास अक्षम्य टाळाटाळ केली. याविरुद्ध असंतोष व्यक्त करणाऱ्या जनतेवर अमानुष लाठीमार केला गेला. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष व एकनाथ शिंदे गटाचे वामन म्हात्रे यांनी एका महिला पत्रकाराशी बोलताना अतिशय अश्लाघ्य भाषा वापरली. या सर्व निषेधार्ह गोष्टी असून हे सरकार तातडीने बरखास्त करा. अशी मागणी माकप तर्फे करण्यात आली.

शनिवारी दुपारी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माकपचे ऍड. कॉ. कुमार मोहरमपुरी, ऍड. कॉ. दिलीप परचाके, कॉ. कवडू चांदेकर, कॉ. शंकर गाऊत्रे, कॉ. नंदू बोबडे, कॉ. अशोक गेडाम, कॉ. विलास कुमरे, कॉ. सुभाष नांदेकर, कॉ. सुनील गेडाम, कॉ. हरीश वासेकर, कॉ. गजानन ताकसांडे, कॉ. अमोल चटप, कॉ. हुसेन आत्राम, कॉ. नेताजी गेडाम, कॉ. अर्जुन शेडमाके इ. उपस्थित होते.

Comments are closed.