बहुगुणी डेस्क, वणी: मुंबईवरून भावाच्या लग्नासाठी वणीत आलेल्या पाहुण्याची बॅग परत जाताना ट्रॅव्हल्समधून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. सोमवारी दिनांक 4 डिसेंबर रोजी साई ट्रॅव्हल्समध्ये ही घटना घडली. या चोरीत दागिने व रोख रक्कम असा एकूण 95 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. भावाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणी वरून नागपूरला ट्रॅव्हल्समधून रोज शेकडो प्रवासी करतात. अनेक लोक डिक्कीत बॅग ठेवतात. मात्र चोरट्याने या बॅगवर डल्ला मारल्याने प्रवाशांना आता सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
सविस्तर वृत्त असे की रवि चंद्रभान सोनेकर (35) हे जैन लेआउट वणी येथील रहिवासी आहे. ते शेती करतात. 10 दिवसांआधी त्यांचे लग्न असल्याने त्यांचा लहान भाऊ हा स्नेहल चंद्रभान सोनेकर रा. टिटवाडा मुंबई हा त्याच्या पत्नीसह लग्नाला वणी येथे आला होता. लग्नकार्य आटोपल्यानंतर 4 डिसेंबरला स्नेहल हा मुंबईला परत जाण्यासाठी निघाला.
दुपारी 1/30 वा. स्नेहल हा नागपूर येथे जाण्याकरिता साई ट्रॅव्हल्स (MH 02 ER 4603) मध्ये बसला. लग्नाला आल्याने त्याच्याकडे 5 बॅग होत्या. त्यामुळे त्यांनी एक बॅग सोबत ठेवली तर इतर बॅग कन्डक्टरने त्यांना ट्रॅव्हल्सच्या मागील डिक्कीट ठेवायला सांगितल्या. 4.30 वाजताच्या सुमारास ते नागपूर येथील अजनी रेल्वे स्टेशन जवळील स्टॉपवर उतरले.
स्नेहल यांनी कन्डक्टरला बॅग काढायला लावल्या असता त्यांना डिक्कीत 3 बॅग दिसून आल्या तर एक बॅग नसल्याचे आढळले. या बॅगबाबत कन्डक्टरला विचारणा केली असता त्याने खापरी (नागपूर) येथे उतरलेल्या प्रवाशां पैकी कुणीतरी नेली असावी असे सांगितले. स्नेहलचे भाऊ रवि यांनी बॅगबाबत साई ट्रॅव्हल्सच्या मालकाची भेट घेऊन विचारणा केली असता त्यांनी देखील याबाबत आम्हाला काही माहिती नसल्याचे सांगितले.
या बॅगमध्ये एक तोळ्याची सोन्याची जुनी वापरती अंगठी किमत अंदाजे 40,000/- रुपये, दिड तोडळे सोन्याचा जुना वापरता गोप किमंत अंदाजे 50,000/- रुपये व नगदी 5000/- रुपये असा एकूण 95 हजारांचा माल मुद्देमाल चोरीला गेला. रवि यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.