सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील बैलमपूर येथील युवकाच्या आत्महत्या प्रकरणाचं गुढ उकललं असून आत्महत्या केलेल्या तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील आणि आत्या यांच्यावर ॲट्रोसिटीसह इतर गुन्हे दाखल केले आहे.
मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बैलमपूर येथे अजय गुलाब टेकाम याने गावातीलच गणपत तुमराम यांच्या शेतात १४ मार्चला रात्री विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. १५ मार्चला पहाटे गावातील नागरिक जात असताना रस्त्यालगत असलेल्या शेतात कुणीतरी असल्याचे आढळले. पाहणी केली असता सदर युवक गावातीलच अजय असल्याचे स्पष्ट झाले.
असे उलकले आत्महत्येचे गुढ
मृतकाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याने या प्रकरणाचे गुढ उकलले. अजयचे एका मुलीसोबत प्रेम होते. प्रेमाची माहिती प्रेयसीच्या कुटूंबाला झाली होती. त्यांच्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे युवकाने लिहून ठेवले.
याप्रकरणी सतीश मडावी यांनी सकाळी ८ वाजता पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता मृतकाच्या तोंडातून फेस निघालेला असल्याचे दिसले. मृतदेहाच्या बाजूला विषारी औषधीचा खाली डबा पोलिसांना आढळून आला. मुकुटबन पोलीसांना याप्रकरणी अट्रोसिटीसह विविध कलमान्वये दोषींविरूद्घ गुन्हे नोंद केले आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक सोनुने करीत आहे..