शाळा क्र. 8 मध्ये बालसंस्कार शिबिर संपन्न

नवागत विद्यार्थ्यांचं करण्यात आलं स्वागत

0

देवेंद्र खरवडे (शैक्षणिक प्रतिनिधी) वणी: वणीतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 8 वणी येथे दि. 21 एप्रिलला नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व बालसंस्कार शिबिराचा समारोपिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती आरती वांढरे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिनानाथ आत्राम होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बंडूजी कांबळे यांनी केले. शाळेत राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व बालसंस्कार शिबिराच्या समारोपिय कार्यक्रमाचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होण्याच्या दृष्टीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 8 मध्ये दि. 16 एप्रिल ते 21 एप्रिल पर्यंत पाच दिवसाचे बालसंस्कार शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी वैयक्तिक स्वच्छता, प्रार्थना, श्लोक,सामाजिक बांधिलकी, बोधकथा याद्वारे विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविण्याच्या दृष्टीने माहिती देण्यात आली. दुसर्‍या दिवशी वैजनाथ खडसे यांनी आनापान क्रिया विषयी माहिती दिली. संस्कार शिबिरामध्ये तिसर्‍या दिवशी कपिल राऊत यांनी चित्रकला व शिल्पकला याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. चौथ्या दिवशी अमोल नागपूरे यांनी योग साधनेचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांचा योग वर्ग घेतला.

समारोपिय कार्यक्रमात इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची पुस्तके देऊन व हार घालून स्वागत करण्यात आले. शिक्षण सभापती आरती वांढरे यांनी पालकांनी आपल्या पाल्याचे नाव नगर परिषद शाळांमध्ये दाखल करण्याचे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.