झरी तालुक्यातील बँड व्यावसायिक संकटात

किमान 5 वाजंत्रींच्या पथकासाठी परवानगी देण्याची मागणी

0

सुशील ओझा, झरी: कुठल्याही समारंभात वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांना मोठी मागणी असते. लग्नसराईत तर या कलाकारांच्या तारखा मिळणे मोठे मुश्किल असते. परंतू मागील तीन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे या शेकडो वादक कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे किमान 5 कलाकार मिळून तरी वाजंत्री व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी झरी तालुक्यातील वाजंत्री पथकाकडून करण्यात आली आहे.

लग्नसमारंभात, निवडणुकीच्या जंगी मिरवणुकीत, छोट्या मोठ्या घरगुती समारंभापासून प्रत्येक ठिकाणी बँड वाजवणाऱ्या कलाकारांची आवश्यकता असते. लग्न समारंभामध्ये वऱ्हाडी मंडळींचा जोश वाढवण्याचे काम हे कलाकार करतात. काही हजारांपासून अगदी लाखो रुपयांपर्यंत या कलाकारांची बिदागी असते. वर्षातील काही दिवसच यांना रोजगार उपलब्ध असतो. या काही दिवसांच्या रोजगारावरच या कलाकारांना आपले कुटुंब वर्षभर चालवावे लागते.

लॉकडाउनमुळे एका छोट्या बँड पथकाचे साडेचार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एका पथकात दहा ते बारा कलाकार असतात. या कलाकारांना वर्षाकाठी चाळीस ते साठ हजार रुपये मानधन आपली कला दाखवण्यासाठी मिळते. परंतु या वर्षी ऐन लग्नसराईच्या काळात लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे कुठलेही काम मिळाले नाही. किंबहुना या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्यामुळे या बँड कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून नियमाने कमीत कमी 5 लोक मिळून बँड वाजविण्याची परवानगी द्यावी जेणे करून उपासमार होणाऱ्या कुटुंबांना जगण्याचे आधार मिळेल. अशी मागणी मुकूटबन येथील आकाश परचाके, मांगली येथील रविराज बोरकर, नामदेव बोरकर यांच्यासह वाजंत्री कलाकरांनी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.