शेतक-यांना कर्ज देण्यास बँकेची टाळाटाळ

बँक व्यवस्थापकाविरुद्ध तहसीलदारांकडे तक्रार

0

सुशील ओझा, झरी: शासनाने कर्जमाफी केली असून, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचे आदेश बॅंकांना दिले आहे. परंतु, बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नकार देत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना खासगी सावकार व मायक्रो फायनान्सकडून अव्वाच्या सव्वा व्याजदरात कर्ज घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याने बँक व्यवस्थापकाविरोधात तहसीलदारांकडे तक्रार दिली आहे.

महादापूर येथील लक्ष्मी मेश्राम यांच्या नावाने शेत सव्र्हे नं. १४१, ६.२० हेक्टर आर जमीन आहे. सदर महिला शेतकरी झरी येथील बँकेत पीककर्जाकरिता व्यवस्थापकाकडे जावून कागदपत्राविषयी विचारणा केली. परंतु व्यवस्थापकाने कोणतेही कागदपत्र व कोणतीही माहिती न देता परत पाठविले. त्या नंतर सदर महिलेने दोन वेळा बँक व्यवस्थापकांकडे चकरा मारल्या. शाखा व्यवस्थापकाने तुम्हाला घर खर्चासाठी पैसे लागते, असा दम देऊन तुम्हाला कर्ज देत नाही, असे म्हणून परतवून लावले.

अखेर महिलेने सदर बँक व्यवस्थापकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनवजा तक्रारीतून केली आहे. यापूर्वी कै. वसंतराव नाईक स्वावलंबन शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सर्व बँकेत जाऊन माहिती घेतली होती. यामध्ये २५ टक्केही शेतकऱ्यांना बोंडअळीची नुकसानभरपाई वाटप केली नसल्याचे समोर आले.

कर्जाकरिता वेगवेगळ्या कागदाच्या नावाने परत पाठविण्याचे काम बँकेकडून केल्या जात असल्यासे उघड झाले. किशोर तिवारी यांनी झरी व मुकुटबन येथील व्यवस्थापकांना चांगलेच धारेवर धरून कान उघाडणी केली होती. परंतु अजूनही बहुतांश बँकेत भोंगळ कारभार सुरू असून, यावर पायबंद कोण लावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.